अहेरीत जंतूयुक्त पाणीपुरवठा

By Admin | Updated: July 11, 2015 02:28 IST2015-07-11T02:28:34+5:302015-07-11T02:28:34+5:30

मागील आठ दिवसांपासून शहरातील काही भागांमध्ये जंतुयुक्त व दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने विविध प्रकारचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Inverted germicidal water supply | अहेरीत जंतूयुक्त पाणीपुरवठा

अहेरीत जंतूयुक्त पाणीपुरवठा

अहेरी : मागील आठ दिवसांपासून शहरातील काही भागांमध्ये जंतुयुक्त व दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने विविध प्रकारचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दूषित व जंतूयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अहेरी शहराला नळ योजनेच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जातो. सदर योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून चालविली जात आहे. या पाणीपुरवठा योजनेची संपूर्ण जबाबदारी प्राधिकरणाकडेच सोपविण्यात आली आहे. अहेरी शहरातील वॉर्ड क्र. ४ मधील इंदिरा नगरामधील बेघर कॉलनीत मागील काही दिवसांपासून अशुद्ध व दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाण्यामध्ये विविध प्रकारचे जंतू आढळून येत आहेत. सदर जंतूयुक्त पाणी पिणे तर सोडाच घरी वापरणेही अशक्य होत आहे. काही नागरिक सदर पाण्याचा वापर करण्याऐवजी विहीर व हातपंपाचे पाणी वापरत आहेत.
पावसाळ्याच्या दिवसात पाण्याबाबत विशेष सतर्क राहणे गरजेचे आहे, असा सल्ला शासन व प्रशासनाकडूनच देण्यात येते. अहेरीमध्ये मात्र विपरित परिस्थिती दिसून येत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बेघर कॉलनीतील श्रीनिवास तुम्मावार, सुमित्रा पुरोहित, चरण मडावी, बापू रामगिरवार, लक्ष्मीदास झोडे यांच्यासह काही नागरिकांच्या नळांमध्ये अशा प्रकारचा दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. माजी ग्राम पंचायत सदस्य शैलेश पटवर्धन यांनीही समस्या नगर परिषदेचे प्रशासक सुरेश पुप्पलवार यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
प्राधिकरणासह नगर पंचायतीचेही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष झाले आहे. नगर पंचायतीने ही समस्या सोडवावी, अशी मागणी वॉर्डातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Inverted germicidal water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.