अंतर्गत शिथिलता हवी पण जीवाची सुरक्षाही महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST2020-04-12T05:00:00+5:302020-04-12T05:00:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात करण्यात आलेले लॉकडाऊन पुन्हा ३० एप्रिलपर्यंत ...

Internal relaxation is important but the safety of life is also important | अंतर्गत शिथिलता हवी पण जीवाची सुरक्षाही महत्त्वाची

अंतर्गत शिथिलता हवी पण जीवाची सुरक्षाही महत्त्वाची

ठळक मुद्देलॉकडाऊनवर मान्यवरांच्या प्रतिक्रिया । गैरसोय दूर करण्याचे नियोजन व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात करण्यात आलेले लॉकडाऊन पुन्हा ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आले. मात्र आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्यामुळे या जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देऊन अंतर्गत व्यवहारात सुरू करावेत, अशी भावना विविध व्यावसायिकांनी व्यक्त केली. मात्र जीव वाचेल तर सर्वकाही पुन्हा मिळवता येईल, असे म्हणत काही नेतेमंडळींनी सरकारी आदेशाचे पालन करणेच योग्य राहील, असे मत मांडले. अचानक लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीबांचे हाल होत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात काही प्रमाणात अंतर्गत व्यवहार सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यास आर्थिक झळ कमी प्रमाणात बसेल, असे मत काहींनी मांडले.

कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असल्यामुळे त्याचे निवारण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार योग्य ती पावले उचलत आहे. हे संकट टाळण्यासाठी थोडे नुकसान सर्वांनाच सहन करावे लागेल. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण नसल्याने थोडी सूट देण्यास हरकत नाही.
- अशोक नेते, खासदार

गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण नसले तरी लगतच्या छत्तीसगड, तेलंगणात आहेत. त्यामुळे अंतर्गत व्यवहार सुरू केले तरी सीमापलिकडील व्यवहार रोखणे सोपे नाही. त्यामुळे सर्व व्यवहार सुरू करण्याची रिस्क घेणे योग्य वाटत नाही.
- धर्मरावबाबा आत्राम
आमदार, अहेरी

सर्व व्यावसायिकांना दिवस वाटून द्या
केवळ किराणा दुकाने एवढीच माणसांची गरज नाही. संसारासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यामुळे सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना आठवड्यातून एक-एक दिवस दिला तरी नागरिकांची कामे अडणार नाही आणि विविध व्यावसायिकांची झळ काही प्रमाणात कमी होईल.
- हरिष कडूकर, अध्यक्ष, नाभिक संघटना गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात प्रशासनाने आधीपासून चांगली भूमिका घेतल्याने कोरोनाची बाधा झाली नाही. बाहेरून येणारे आता थांबल्यामुळे नवीन रुग्ण येण्याची शक्यता नाही. त्यामुळे जिल्ह्यांतर्गत व्यवहार सुरू ठेवणे गरजेचे आहे. व्यवहार ठप्प झाल्याने गोरगरिबांना जगणे कठीण झाले आहे. योग्य खबरदारी घेऊन व्यवहार सुरू करावे.
- जेसा मोटवानी,
व्यापारी संघटना, देसाईंगंज

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित एकही रुग्ण आढळला नाही ही बाब निश्चितच चांगली आहे. पण आतापर्यंत कोणाला बाधा झाली नाही म्हणून पुढेही होणार नाही, असे नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन सर्व स्तरावर उपाययोजना करत आहे. तरीही नागरिकांची गैरसोय दूर करण्याचे नियोजन व्हावे.
- अजय कंकडालवार
अध्यक्ष, जिल्हा परिषद

Web Title: Internal relaxation is important but the safety of life is also important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.