किडींचे एकात्मिक नियंत्रण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST2020-08-30T05:00:00+5:302020-08-30T05:01:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : ढगाळ वातावरण, अधिक आर्द्रता, शेतातील साचलेले पाणी, अनियमित पाऊस यामुळे धानपिकावर गादमाशी, खोडकिडा, तुडतुडे ...

किडींचे एकात्मिक नियंत्रण करा
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : ढगाळ वातावरण, अधिक आर्द्रता, शेतातील साचलेले पाणी, अनियमित पाऊस यामुळे धानपिकावर गादमाशी, खोडकिडा, तुडतुडे आदी कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे, असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिला.
आरमोरी तालुक्यातील वैरागड, सुकाळा, मोहझरी, पिसेवडधा येथील शेतात कृषी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी शेतीच्या बांधावर प्रत्यक्ष भेट देऊन धानपिकावर प्रादुर्भाव झालेल्या खोडकिडा, गादमाशी, तुडतुडे आदींची पाहणी केली. पिकावरील रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे. परिसरात चार ते पाच शेतकरी असल्यास पाचही शेतकऱ्यांनी एक-दोन दिवसाच्या आड पिकावर फवारणी करावी. तेव्हाच कीड नियंत्रण होऊ शकते. पूर्ण वाढ झालेली कीड एका दिवसात २०० अंडी घालते. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो. रोग नियंत्रणात आणण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे, असे तालुका कृषी अधिकारी टी.डी.ढगे यांनी सांगितले.
रोवणी करताना अनेक शेतकरी दाटीने रोवणी करतात. त्यामुळे धानपिकावर रोगांचा प्रादुर्भाव लवकर होतो. किडीचा प्रादुर्भाव झाला तर त्यांचे व्यवस्थापन करण्यास अडचणी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी श्री पद्धत किंवा पट्टा पद्धतीने धानाची रोवणी करावी, असे सांगण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी संदीप ढोणे, तालुका कृषी पर्यवेक्षक जी.एन.जाधवर व शेतकरी उपस्थित होते.
उत्पादनात घटीची शक्यता
यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धान पेरणी केल्यानंतर तब्बल दीड महिने तर काही भागात दोन महिन्यांनी पाऊस बरसला. हलक्या व मध्यम प्रतीच्या धानाचा निम्मा कालावधी उलटला. त्यानंतर शेतकऱ्यांनी रोवणी केली. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात धानपिकाचा निसवा व्हायचा. परंतु यावर्षी अनेक भागात आताही रोवणी सुरू आहे. त्यामुळे हलक्या व मध्यम प्रतीच्या धानाच्या उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता आहे.