समस्या सोडविण्याचे एसडीओंचे निर्देश
By Admin | Updated: September 17, 2016 01:50 IST2016-09-17T01:50:40+5:302016-09-17T01:50:40+5:30
वेलगूर परिसरातील विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

समस्या सोडविण्याचे एसडीओंचे निर्देश
अहेरीत तीन तास चर्चा : आंदोलनकर्ते व अधिकाऱ्यांमध्ये अनेक प्रश्नांवर विचारमंथन
अहेरी : वेलगूर परिसरातील विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या आंदोलनाची दखल घेऊन ठरल्याप्रमाणे एसडीओ राममूर्ती यांनी शुक्रवारी अहेरीत अधिकारी व आंदोलनकर्त्यांची बैठक आयोजित करून आंदोलनकर्त्यांच्या समस्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तब्बल तीन तास चाललेल्या बैठकीत विविध समस्यांवर विचारमंथन करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांच्या नेतृत्त्वात वेलगूर परिसरातील नागरिकांची बैठक उपविभागीय अधिकारी राममूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, वनिता नेरलवार, आत्माराम गद्देकार, राजेश उत्तरवार, सरपंच कुसूम दुधी, अंजना पेंदाम, उपसरपंच शंभू झोडे, जि. प. सदस्य विजया विठ्ठलानी, पुष्पा अलोणे, ग्रा. पं. सदस्य आदील पठाण, अरविंद खोब्रागडे, देवाजी मडावी, विनायक बोरूले व नागरिक उपस्थित होते. एसडीओ राममूर्ती यांनी वनहक्क दाव्यांसह विविध समस्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश उपस्थित विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांनी दिली कामांची माहिती
वेलगूर-बोटलाचेरू रस्ता जि. प. ने मंजूर केला असून सध्या दुरूस्ती सुरू आहे. पावसाळ्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण होईल, अशी माहिती उपविभागीय अभियंता मडावी यांनी दिली. वेलगूर येथे २२० केव्हीच्या नवीन ट्रॉन्सफॉर्मरसाठी प्रस्ताव तयार असून ५ लाखाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच दर बुधवारला विद्युत भरणा करण्यासाठी दोन कर्मचारी उपस्थित राहणार असल्याचे विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वेलगूर प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरपूर रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करावे व ६०० मीटर रस्त्याचे बांधकाम जि. प. ने करावे, याकरिता सीईओंना पत्र देण्यात आले आहे. वेलगूर येथे थ्री-जी सेवेसाठी आलापल्ली ते वेलगूर पर्यंत भूमिगत फायबर आप्टिक केबल टाकण्यासाठी आराखडा तयार करून तो सादर करावा व खोदकामासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी पाठपुरावा करावा, याबाबत पत्र देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रोहयो मजुरी तसेच घरकूल योजनेचे हप्ते वाटपास मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती बीडीओ तडस यांनी दिली. तर रस्ता दुरूस्तीनंतर १९ बसफेऱ्या वेलगूर-बोटलाचेरू सुरू होतील, अशी माहिती आगारप्रमुख फाल्गुन राखडे यांनी दिली.