सापळे पीक पद्धतीतून कारल्यांची नाविन्यपूर्ण शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:45 IST2021-02-20T05:45:12+5:302021-02-20T05:45:12+5:30

अतुल बुराडे विसोरा : धानपट्ट्यातील शेतकरीही आता आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करायला लागले आहेत. किन्हाळा या गावातील एका शेतकऱ्याने ...

Innovative cultivation of caraway through trap cropping method | सापळे पीक पद्धतीतून कारल्यांची नाविन्यपूर्ण शेती

सापळे पीक पद्धतीतून कारल्यांची नाविन्यपूर्ण शेती

अतुल बुराडे

विसोरा : धानपट्ट्यातील शेतकरीही आता आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करायला लागले आहेत. किन्हाळा या गावातील एका शेतकऱ्याने कृषी विभागाच्या मार्गदर्शनात असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोग करत सापळे पद्धतीतून कारल्यांची लागवड केली. त्यात आंतरपीक म्हणून झेंडूच्या फुलांचे लागवड केली. त्यामुळे या शेतकऱ्यांला दुहेरी उत्पन्न मिळणार आहे. बेभरवशाची शेती म्हणून नेहमीच हिणवल्या जाणाऱ्या या व्यवसायातून तांत्रिक मार्गदर्शन आणि मेहनतीतून चांगले उत्पन्न घेता येऊ शकते, हेच यातून दिसून येते.

आता वर्षभरात कधीही पाऊस पडतो. त्यामुळे अनेक वेळा शेतातील अंदाज चुकतात. त्यात धान पट्ट्यातील शेतकरी धान पिकालाच अधिक प्राधान्य देतात. मात्र देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतातल्या पीक पद्धतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. विसोऱ्यापासून दक्षिणेस १० किमीवरच्या किन्हाळा येथील पुरुषोत्तम ठाकरे या शेतकऱ्याने कारली पिकासोबत सापळे पीक पद्धतीचा वापर केला. त्यात आंतरपीक म्हणून झेंडू फुलांची लागवड केली. एकाच खर्चात दोन उत्पन्नाचे स्रोत या शेतकऱ्याने निर्माण केले. विशेष म्हणजे, झेंडू लागवडीतून जमिनीसोबत पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे कामही होत असल्याची माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली.

सध्या कारली आणि झेंडू फुलांची रोजच तोडणी केली जात आहे. एकूणच या शेतकऱ्याने आर्थिक लाभ आणि जमिनीसोबत पर्यावरणीय संतुलन राखले आहे. हा शेती प्रयोग इतर अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा आहे.

आता शेती नफ्याची राहिलेली नाही अशी ओरड शेतकरी वर्ग करीत असताना काही शेतकरी आहे त्याच परिस्थितीत नवीन दृष्टिकोन समोरे ठेवून शेती करताना दिसत आहेत. यासाठी तालुका कृषी अधिकारी नीलेश गेडाम आणि एस.जी.रणदिवे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले.

(बॉक्स)

झेंडूमुळे तिहेरी लाभ

कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून किन्हाळाच्या पुरुषोत्तम ठाकरे यांना कारलीच्या शेतामध्ये सापळे पीक पद्धतीचा वापर करण्याचे सुचले. कारली पिकाची लागवड केल्यावर जी जागा उरते त्या मोकळ्या जागेमध्ये ठाकरे यांनी झेंडू फुलांची लागवड केली. झेंडूची फुले मधमाशांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. त्यामुळे फुलांवरील परागीकरण चांगल्या प्रकारे होते. दुसरे झेंडूच्या मुळांमुळे जमिनीतील सूत्रकृमींचे नियंत्रण होते. सूत्रकृमी कोणत्याही पिकांच्या मुळांना नष्ट करू शकतात. आणि तिसरे झेंडू विक्रीतून उत्पन्नात भर, असा तिहेरी फायदा झेंडूच्या शेतीतून होतो.

Web Title: Innovative cultivation of caraway through trap cropping method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.