संतप्त मजुरांची तहसीलवर धडक
By Admin | Updated: February 4, 2016 01:25 IST2016-02-04T01:25:27+5:302016-02-04T01:25:27+5:30
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत धानोरा नगर पंचायत क्षेत्रात कामे सुरू करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा,

संतप्त मजुरांची तहसीलवर धडक
रोहयोंतर्गत कामे द्या : तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
धानोरा : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत धानोरा नगर पंचायत क्षेत्रात कामे सुरू करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी नगर पंचायत क्षेत्रातील संतप्त शेकडो शेतकरी व शेतमजूर तहसील कार्यालयावर धडकले.
धानोराचे तहसीलदार सुधाकर मडावी यांना भेटून रोहयो कामासंदर्भात मजुरांनी चर्चा केली. प्रशासनाच्या आवाहनानुसार धानोरा नगर पंचायत क्षेत्रातील अनेक मजुरांनी रोजगार हमी योजनेच्या कामासाठी नोंदणी केली आहे. मात्र अद्यापही प्रशासनाच्या वतीने रोहयोची कामे सुरू करून रोजगार देण्यात आला नाही. आधीच दुष्काळी व नापिकीची स्थिती आहे. अशा परिस्थितीत शेतकरी, शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार सुधाकर मडावी यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले.
निवेदन देताना तुकाराम गडपायले, बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी रमेश मडावी, वंदना गडपायले, मुखरू मोहुर्ले, प्रतिभा गुरनुले, दिलीप गुरनुले, मंगला मोहुर्ले, सदाशिव ठाकरे, पार्वता ठाकरे, छाया लोनबले, अरूणा सोनुले, भास्कर सोनुले, वामण लोनबले, एकनाथ सोनुले, दिलीप निकेसर, रमेश सहारे, गीता सहारे, श्रीकृष्ण गुरनुले आदींसह शेकडो मजूर व नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
मुख्याधिकाऱ्यांनाही घातले साकडे
धानोरा नगर पंचायत क्षेत्रात अद्यापही रोजगार हमी योजनेंतर्गत काम सुरू करण्यात न आल्याने शेकडो मजूर बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे तत्काळ नगर पंचायतीच्या क्षेत्रात रोहयोची कामे सुरू करण्यात यावी, अशा मागणीचे साकडे मजुरांनी धानोरा न. पं. चे मुख्याधिकारी मेश्राम यांना निवेदनाद्वारे घातले आहे. कामे सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा तुकाराम गडपायले यांनी दिला आहे.