सूरजागडात काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू

By Admin | Updated: February 4, 2017 02:18 IST2017-02-04T02:18:32+5:302017-02-04T02:18:32+5:30

तब्बल दहा वर्षानंतर एटापल्ली तालुक्याच्या सूरजागड पहाडीवर खासगी कंपनीकडून लोहखनिज उत्खननाला सुरुवात करण्यात आली होती.

Initiation of starting work in Surajgarh | सूरजागडात काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू

सूरजागडात काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू

 स्थानिक मजुरांनाही कामाची प्रतिक्षा : जळालेले वाहन उचलण्याचे काम पूर्ण
गडचिरोली : तब्बल दहा वर्षानंतर एटापल्ली तालुक्याच्या सूरजागड पहाडीवर खासगी कंपनीकडून लोहखनिज उत्खननाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र येथे डिसेंबर महिन्यात ७९ वाहने जाळल्याने पुन्हा हे काम खंडित झाले होते. आता जळालेली वाहने उचलून नेण्यात आली आहे. त्यामुळे खासगी कंपनीकडून पुन्हा उत्खनन कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. बाराही महिने काम नसणाऱ्या या भागातील शेकडो नागरिकांना येथे काम कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध होण्याची शक्यता यानिमित्ताने निर्माण झाली आहे.
२००६ मध्ये सूरजागड पहाडीवर जवळजवळ पाच ते सहा खासगी कंपनींना लोहखनिज उत्खननासाठी लीज मंजूर करण्यात आली होती. मात्र माओवाद्यांच्या प्रखर विरोधामुळे येथे काम सुरू होऊ शकले नाही. २०१५ मध्ये केंद्र सरकारने दिल्ली येथे बैठक घेऊन गृह विभागाला या भागात सुरक्षा व्यवस्था वाढविण्याबाबत व उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करण्याबाबत पावले उचलण्यास सुचविण्यात आले. त्यानंतर या भागात लायड्स मेटल या कंपनीकडून उत्खननाला सुरुवात करण्यात आली.
जवळजवळ आठ महिने या कंपनीकडून लोहखनिज उत्खननाचे काम चालले. ३५० स्थानिक मजुरांना ३०० रूपये रोजीनुसार येथे काम उपलब्ध करून देण्यात आले होते. परिसरातील १० गावातून मजूर येथे टप्प्याटप्प्याने कामावर येत होते. मात्र २३ डिसेंबरला नक्षलवाद्यांनी कार्यस्थळावर हल्ला करून ७९ वाहने जाळले. त्यानंतर काम ठप्प झाले होते. जानेवारी महिन्यात जळालेले वाहने क्रेनच्या सहाय्याने उचलून नेण्यात आले. आता परत येथे काम सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कंपनीला १७०० हेक्टर क्षेत्रावर लीज मिळालेली आहे. त्यामुळे या भागात उत्खननाचे काम या महिन्यात सुरू होईल, असे चिन्ह आहे. स्थानिक गावातील बरेच नागरिक येथे कंपनीचे काम सुरू व्हावे, यासाठी संपर्क करीत असल्याची माहिती मिळाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Initiation of starting work in Surajgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.