शेतकऱ्यांना दिली तंत्रज्ञानाची माहिती
By Admin | Updated: March 15, 2015 01:15 IST2015-03-15T01:15:29+5:302015-03-15T01:15:29+5:30
जिल्हा परिषद गडचिरोली व पंचायत समिती अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील नवेगाव (वेलगूर) येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले.

शेतकऱ्यांना दिली तंत्रज्ञानाची माहिती
अहेरी : जिल्हा परिषद गडचिरोली व पंचायत समिती अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील नवेगाव (वेलगूर) येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. या मेळाव्यादरम्यान आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे सभापती रवीना गावडे होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती सोनाली कंकडालवार, जि. प. सदस्य विजया विठ्ठलानी, लैजा चालुरकर, पं. स. सदस्य आत्माराम गद्देकर, सुखदेव दुर्योधन, यमुना आत्राम, ऋषी पोरतेट, वेलगूरचे सरपंच लालू करपेत, उसरपंच उमेश मोहुर्ले, पोलीस पाटील मनोहर चालुरकर, किष्टापूरचे सरपंच भगवान आत्राम, उपसरपंच अशोक येलमुले, पोलीस पाटील महेश अर्का, वेलगूरचे पोलीस पाटील प्रभाकर शेंडे, अहेरीचे बीडीओ सुभाष चांदेकर, जिल्हा कृषी अधिकारी एस. टी. पठाण, विस्तार अधिकारी एम. के. काळबांधे आदी मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्याला वेलगूर परिसरातील दहा गावचे नागरिक उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान कृषी तज्ज्ञांनी रोवणी यंत्र, चिखल यंत्र, धान कापणी, मळणी यंत्राच्या वापराचे फायदे, ते कसे वापरावे याची माहिती दिली. त्याचबरोबर मानव विकास मिशनच्या माध्यमातून सदर यंत्र अनुदानावर उपलब्ध करून दिले जातात. हे यंत्र प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शासनाकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
मेळाव्याचे प्रास्ताविक कृषी अधिकारी वाय. बी. पदा यांनी केले. संचालन विस्तार अधिकारी एस. के. फुलझेले तर आभार विस्तार अधिकारी पी. आर. रायपुरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी ग्रामविकास अधिकारी सी. डी. संदुकवार, किष्टापूरचे ग्रामसेवक व्ही. पी. वेलादी यांच्यासह वेलगूर, नवेगाव येथील नागरिकांनी सहकार्य केले. मेळाव्याला दहाही गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)