दुष्काळी योजनांची माहिती द्या
By Admin | Updated: October 21, 2015 01:35 IST2015-10-21T01:35:35+5:302015-10-21T01:35:35+5:30
राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

दुष्काळी योजनांची माहिती द्या
देसाईगंज येथे आढावा बैठक : खासदारांचे अधिकाऱ्यांना निर्देश
देसाईगंज : राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या दुष्काळग्रस्त गावांना विविध सोयीसवलती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत व विविध योजना राबविल्या जाणार आहेत. या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले आहे.
स्थानिक नगर पालिकेच्या सभागृहात मंगळवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. आढावा बैठकीला आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे, भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, नगराध्यक्ष श्याम उईके, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे, तहसीलदार अजय चरडे, गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, नगरसेवक राजू जेठाणी, नाना नाकाडे, नगरसेविका शालू दंडवते, सुनीता ठेंगरी आदी मान्यवर उपस्थित होते.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयणीय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीयस्तरावरून विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. केंद्र शासनाने मुद्रा योजना सुरू केली आहे. या योजनेचा सुद्धा लाभ घेण्याचे आवाहन केले. तालुक्यातील वीज, मामा तलावांचे खोलीकरण, रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण, शंकरपूर येथील ३३ केव्हीचे विद्युत केंद्र तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या. मुख्यालयी राहण्याचा मुद्याही उपस्थित केला.
आढावा बैठकीची पूर्वसूचना देऊनही पाच खातेप्रमुख आढावा बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. आढावा बैठकीदरम्यान विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. शांतता कमिटीच्या माध्यमातून पोलीस विभागाने शहरात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावा, तसेच शहरात घडणाऱ्या लहान-मोठ्या घटनांवर जातीने लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)