सराफा बाजाराला भाववाढीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST2019-10-27T06:00:00+5:302019-10-27T06:00:33+5:30
सद्य:स्थितीत गडचिरोलीच्या सराफा बाजारात शुद्ध सोने १० ग्रॅम अर्थात एक तोळ्याचा भाव ३९ हजार रुपये आहे तर चांदी प्रती तोळा ४७० रुपये आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या दिवाळी सणात सोन्याचे भाव प्रती तोळा ३२ हजार रुपये होते. दोन ते तीन महिन्यापूर्वी सोन्याचे भाव स्थिर होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात प्रचंड वाढ झाली.

सराफा बाजाराला भाववाढीचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दिवाळी सणाला सुरूवात झाली असून सर्वत्र आनंद व भरभराटीचे वातावरण आहे. दिवाळी सणाला सर्वात जास्त खरेदी कापड व वाहनांची होते. दिवाळी सणादरम्यान सोने खरेदीला अत्यंत महत्त्व आहे. मात्र सोन्याच्या किमती वाढल्यामुळे सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल कमी असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सराफा बाजारात उलाढाल कमी होती. मात्र धनत्रयोदशीपासून बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढली आहे.
सद्य:स्थितीत गडचिरोलीच्या सराफा बाजारात शुद्ध सोने १० ग्रॅम अर्थात एक तोळ्याचा भाव ३९ हजार रुपये आहे तर चांदी प्रती तोळा ४७० रुपये आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या दिवाळी सणात सोन्याचे भाव प्रती तोळा ३२ हजार रुपये होते. दोन ते तीन महिन्यापूर्वी सोन्याचे भाव स्थिर होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात प्रचंड वाढ झाली. गेल्या दिवाळीच्या तुलनेत तब्बल सात हजार रुपयाने सोन्याचे भाव वाढले आहेत.
सामान्य ग्राहक सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक करण्याबाबत सांशक आहेत. भाव कमी होतील, असे त्यांना वाटते. त्यामुळे सध्या सराफा बाजारात पाहिजे तशी गर्दी नाही. बाजारात दिवाळीनिमित्त सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी व्यावसायिकांकडून आॅफर आहे. तरी सुद्धा ग्राहक खरेदीप्रती निरूत्साही दिसून येत आहे. याला विविध घटक कारणीभूत आहेत.
गडचिरोली जिल्हा हा कृषीप्रदान जिल्हा आहे. येथे हलक्या, मध्यम व जड या तीन प्रतीच्या धानपिकाची लागवड केली जाते. हलक्या पिकाची कापणी व बांधणी आटोपली आहे. मात्र गेल्या पाच-सहा दिवस अवकाळी पाऊस बरसल्याने हलक्या प्रतीच्या धानपिकाचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. मध्यम व जड प्रतीच्या धानावर रोगाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे यंदा उत्पादन घटणार, अशी भीती त्यांच्यामध्ये आहे.
लग्न हंगामात खरेदी वाढणार
सध्या सोन्याचे भाव प्रतितोळा ३९ हजार रुपये आहे. दिवाळीनंतर सोन्याचे भाव ४४ ते ४५ हजारावर जाऊ शकते. सध्या बाजारात किरकोळ दागिण्यांना मागणी आहे. यामध्ये अंगठी, ब्रेसलेट, बांगडी आदींचा समावेश आहे. यंदा लग्न विवाहाचे मुहूर्त जास्त आहेत. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या लग्न हंगामात सोन्याच्या दागिण्याची खरेदी वाढण्याची शक्यता आहे, असा विश्वास येथील सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. दिवाळीनिमित्त अनेक महिला बेनटेक्सचे दागिणे खरेदी करताना दिसून येत आहे.
कर्मचाऱ्यांना अग्रीम रकमेवर भागवावा लागत आहे सणाचा खर्च
गडचिरोली जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय कार्यालयात अनेक कर्मचारी आहेत. शाळा, महाविद्यालयामध्ये शिक्षक आहेत. काही कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र बऱ्याच कार्यालयातर्फे वेतन काढण्याची प्रक्रिया करण्यात आली नाही. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना अग्रीम रकमेवर दिवाळी सणाचा खर्च भागवावा लागत आहे. शासकीय आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांना दिवाळीसाठी १२ हजार ५०० रुपये इतका अग्रीम अदा करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्याचे वेतन झाले नसल्याने दिवाळीसाठी ही अग्रीम रक्कम देण्यात आली आहे. या रकमेवर खरेदी सुरू आहे.