अहेरी : आरोग्य विभागाच्यावतीने गावागावात फवारणी न झाल्याने यंदा डासांचा प्रादुर्भाव अधिक वाढणार आहे. सध्या डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. आलापल्ली शहरात नाल्यांतील गाळाचा उपसाही नियमित हाेत नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
माहिती केंद्र निर्माण करण्याची मागणी
काेरची : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून हाेत आहे.
ग्राहकांना मिळते बनावट बिल
गडचिरोली : प्रत्येक ग्राहकाला जीएसटी क्रमांक असलेले बिल देणे गरजेचे असतानाही काही अपवादात्मक दुकानदार वगळता बहुतांश दुकानदार बनावट बिल देऊन फसवणूक करीत आहेत. शहरी भागातील अनेक दुकानदार जीएसटी क्रमांक नसलेले बनावट बिल ग्राहकांना देत आहेत.
रखडलेले अनुदान मिळण्याची आशा
गडचिराेली : तालुक्यात धडक सिंचन विहीर योजनेची कामे करण्यात आली. विहीर खोदकाम केलेल्या लाभार्थ्यांना धनादेश देण्याचे आदेश आहेत. मात्र, मंजूर झालेल्या विहिरींचे खोदकाम करूनही अनुदान मिळत नसल्याने अनेकांची कामे रखडली आहेत. निवेदनांची दखल घेऊन अनुदान देण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करावे
अहेरी : केंद्र व राज्य शासनाने दिव्यांगांच्या हितासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. मात्र, तालुक्यात योजनांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे दिव्यांग विकासापासून वंचित आहेत. प्रशासनाने दिव्यांगांचे सर्वेक्षण करून विकास योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी परिसरातील दिव्यांग व्यक्तीकडून करण्यात येत आहे.
हागणदारी मुक्तीवर प्रश्नचिन्ह
विसोरा : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे; मात्र ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाहीत. परिणामी, शौचालयाचा वापर न झाल्याने हागणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे. घरी शाैचालय असूनही ग्रामीण भागातील वयाेवृद्ध जुन्या विचाराचे लाेक बाहेर शाैचास जात आहेत.
बसस्थानकाचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच
चामाेर्शी : तालुक्याची निर्मिती होऊन अनेक वर्षांचा कालावधी लोटला. लाेकप्रतिनिधींनी बसस्थानक उभारू, अशी ग्वाही दिली. अद्यापही हा प्रश्न निकाली निघाला नसल्याने नाराजी आहे.
प्रखर दिव्यांमुळे अपघाताचा धोका
गडचिराेली : दुचाकी वा चारचाकी वाहनांपुढे दिवे (हेड लाईट) लावले जातात. मात्र काही तरुण साधे दिवे न लावता निळ्या रंगाचे तसेच प्रखर दिवे लावत असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. काही युवक आपल्या दुचाकी वाहनांना प्रखर दिवे लावून लक्ष विचलित करून घेतात. पाेलिसांनी अशा वाहनचालकांवर कारवाई करावी.