आॅनलाईन प्रक्रियेने केला नामाकंन दाखल करण्याचा खोळंबा
By Admin | Updated: October 2, 2015 06:12 IST2015-10-02T06:12:30+5:302015-10-02T06:12:30+5:30
जिल्ह्यात १० नगर पंचायतीपैकी सहा नगर पंचायतींची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्यात येत आहे. येथे निवडणूक

आॅनलाईन प्रक्रियेने केला नामाकंन दाखल करण्याचा खोळंबा
गडचिरोली : जिल्ह्यात १० नगर पंचायतीपैकी सहा नगर पंचायतींची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्यात येत आहे. येथे निवडणूक प्रक्रियेला गुरूवारपासून प्रारंभ झाला. परंतु आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याबाबत तालुका प्रशासनाने सूचना केली असल्याने उमेदवारांचा चांगलाच गोंधळ उडाला. पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकही नामांकन अर्ज दाखल होऊ शकला नाही.
गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १ नोव्हेंबर रोजी मतदान होणाऱ्या सहा नगर पंचायतीसाठी गुरूवारपासून निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी, चामोर्शी या सहा नगर पंचायतीसाठी १ आॅक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. अहेरी, चामोर्शी या दोन मोठ्या नगर पंचायतीसह उर्वरित चार नगर पंचायतीत अर्ज दाखल करण्याकरिता इच्छुक उमेदवार तहसील कार्यालयात गेले असताना उमेदवारांना आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याबाबत सूचना करण्यात आली होती. चामोर्शी येथे राज्य निवडणूक आयोगाच्या आॅनलाईन संकेतस्थळ बराच वेळ ओपनच झाले नाही. त्यामुळे बराच खोळंबा झाला. त्यानंतर दुपारी ३ वाजतानंतर गडचिरोली जिल्ह्याला आॅनलाईन नामांकन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेतून सूट देण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या बाबीला चामोर्शीचे नायब तहसीलदार एस. के. चडगुलवार यांनी लोकमतशी बोलताना दुजोरा दिला. अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा येथे पहिल्या दिवशी एकही नामांकन पत्र दाखल झाले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
अर्ज तयार केले जाणार
राज्य निवडणूक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरावे, असे सांगितले होते. मात्र याला स्थगिती मिळाल्यावर आता तालुका निवडणूक प्रशासन अर्ज तयार करणार आहेत.