मुलींचा जन्मदर वाढतीवर
By Admin | Updated: January 31, 2017 02:03 IST2017-01-31T02:03:28+5:302017-01-31T02:03:28+5:30
मुलामुलींचे लिंग गुणोत्तर योग्य प्रमाणात राहावे, तसेच मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी आरोग्यासह

मुलींचा जन्मदर वाढतीवर
जनजागृतीची फलश्रूती : शासकीय योजनांचाही परिणाम
गडचिरोली : मुलामुलींचे लिंग गुणोत्तर योग्य प्रमाणात राहावे, तसेच मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी आरोग्यासह विविध प्रशासकीय विभागातर्फे जनजागृती सुरू आहे. शिवाय मुलींकरिता विविध शासकीय योजनाही कार्यान्वित करण्यात आल्या आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात आता मुलींचा जन्मदर वाढत असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील जानेवारी ते डिसेंबर २०१६ या वर्षभराच्या कालावधीतील आकडेवारीनुसार मुलांपेक्षा मुलींच्या जन्माचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०१६ या वर्षभराच्या कालावधीत गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात २ हजार ४२३ इतक्या मुलांचा जन्म झाला तर त्यापेक्षा अधिक म्हणजे, २ हजार ६९३ इतक्या मुलींचा जन्म झाला.
मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाने लिंग परीक्षण चाचणी कायद्याने बंद केली आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा व अन्य रूग्णालय स्तरावर स्वतंत्र समितीही गठीत करण्यात आली आहे. या समितीतील अधिकारी जिल्ह्याच्या विविध सोनोग्राफी केंद्राला भेट देऊन त्या ठिकाणी लिंग परीक्षण केले जाते काय, याबाबत खातरजमा करीत असतात. लिंग परीक्षण होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित सोनोग्राफी केंद्र संचालकावर कारवाई करण्यात येते. त्यामुळे लिंग परीक्षणाचे काम गडचिरोली जिल्ह्यात बंद झाले आहे. मुलींच्या जन्माचे पालक व समाजांकडून उस्फूर्त स्वागत झाले पाहिजे. मुलगा, मुलगी असा भेदभाव नष्ट व्हावा याकरिता शिक्षण, समाज कल्याण तसेच इतर प्रशासकीय विभागातर्फे गावपातळीवरही जनजागृती मोहीम राबविली जाते. याशिवाय मुलींच्या शिक्षणाकरिता राज्य शासनातर्फे विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या सर्व कारणामुळे आता गडचिरोली जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलीच्या जन्माचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयासह जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातही मुलींचा जन्मदर वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)
वर्षभरात ९०० वर बालकांचा मृत्यू
४गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने गरोदर माता प्रसुतीसाठी येतात. येथील प्रसुती वार्डात नेहमी गर्दी असते. जानेवारी ते डिसेंबर २०१६ या वर्षभराच्या कालावधीत या रूग्णालयात मुले, मुली मिळून एकूण ५ हजार ११६ बालकांचा जन्म झाला. वर्षभरात ९४९ बालकांचा मृत्यू झाला, अशी माहिती सामान्य रूग्णालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे, आॅगस्ट व सप्टेंबर या महिन्यात सर्वाधिक अनुक्रमे १०५ व १०७ बालकांचा मृत्यू झाला.
४पाच ते सहा वर्षापूर्वी राज्याच्या काही भागात स्त्रीभृण हत्येचे प्रमाण अधिक होते. मात्र याबाबतचा कायदा कठोर केल्याने तसेच प्रशासनाच्या जनजागृतीमुळे स्त्रीभृण हत्येचे प्रमाण कमी झाले आहे. बहुतांश कुटुंब आता मुलीच्या जन्माचे स्वागत करीत आहेत.
मुलामुलींच्या जन्माचा तपशील (सामान्य रूग्णालय)
महिना पुरूष स्त्री एकूण प्रमाण
जानेवारी १९७ १९६ ३९३ १००.५१
फेब्रुवारी १५६ २०३ ३५९ ७६.८४
मार्च २१३ ३१९ ४३२ ९७.२६
एप्रिल २०९ २४१ ४५० ८६.७२
मे २१६ २३५ ४५१ ९१.९१
जून १६९ १८९ ३५८ ८९.४१
जुलै १७९ २०४ ३८३ ८७.७४
आॅगस्ट २०१ २२९ ४३० ८७.७७
सप्टेंबर २३० २१५ ४४५ १०६.९७
आॅक्टोबर २०९ २४५ ४५४ ८५.३०
नोव्हेंबर २२३ २२३ ४४६ १००
डिसेंबर २२१ १९४ ४१५ ८७.७८
एकूण २४२३ २६९३ ५११६