वाढीव पाणी योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:01 IST2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:01:55+5:30

वैरागड गावाजवळून खोब्रागडी, वैलोचना या नद्या बारमाही वाहतात. गावाच्या उत्तरेला भंडारेश्वर मंदिराच्या थोड्या अंतरावर ज्या ठिकाणी वैलोचना, खोब्रागडी व नाडवाही या तीन नद्यांचा संगम आहे. या संगमाच्या वरील भागात बारमाही पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. त्याला गोरजाईचा डोह म्हणून ओळखल्या जाते.

Increased water plan kept | वाढीव पाणी योजना रखडली

वाढीव पाणी योजना रखडली

ठळक मुद्देटंचाईची समस्या कायम : गोरजाई डोहावर प्रस्तावित योजना थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : आरमोरी तालुक्याच्या वैरागड गावात एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून एक दिवसाआड नळाला पाणी येत आहे. मे-जून महिन्यात अर्ध्या गावाला पिण्याचे पाणी मिळत नाही. दरवर्षीच्या उन्हाळ्यातील पाणी टंचाईची समस्या निकाली काढण्यासाठी गोरजाई डोहावर प्रस्तावित करण्यात आलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम थंडबस्त्यात आहे.
वैरागड गावाजवळून खोब्रागडी, वैलोचना या नद्या बारमाही वाहतात. गावाच्या उत्तरेला भंडारेश्वर मंदिराच्या थोड्या अंतरावर ज्या ठिकाणी वैलोचना, खोब्रागडी व नाडवाही या तीन नद्यांचा संगम आहे. या संगमाच्या वरील भागात बारमाही पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. त्याला गोरजाईचा डोह म्हणून ओळखल्या जाते. गावातील वाढती पाण्याची मागणी लक्षात घेऊन गोरजाई डोहावर जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग कुरखेडा यांच्याकडून नवीन पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करून मंजूर करण्यात आली. मात्र सदर योजनेचे काम कोणत्या एजन्सीमार्फत करायचे हे ठरले नसल्यामुळे पाणी पुरवठा योजनेचे काम पुढे सरकू शकले नाही.
एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून अर्ध्याअधिक गावाला नळाचे पाणी मिळत नाही. ज्या कुटुंबांच्या घरी नळाला पाणी येत आहे अशा ठिकाणी लगतच्या घरातील महिलांची पिण्याचे पाणी नेण्यासाठी गर्दी होत आहे. ही समस्या मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

३५ वर्षापूर्वीची पाणी योजना अपुरी
३५ वर्षांपूर्वी वैरागड येथे वैलोचना नदीवर नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेंतर्गत ७५ हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी उभारण्यात आली. ३५ वर्षांनंतर वैरागडची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे ही पाणी योजना अपुरी पडत आहे. वाढीव वस्तीमध्ये नळ पाणीपुरवठ्याचा अभाव आहे.

सदर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी आपण सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची मंजुरी प्राप्त झाली आहे. सदर योजनेचे आर्थिक बजेट मोठे असल्याने मंत्रालयात याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे.
- गौरी सोमनानी, सरपंच, ग्रा.पं.वैरागड

Web Title: Increased water plan kept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.