लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे वाढले टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:21 IST2019-05-21T22:21:00+5:302019-05-21T22:21:43+5:30

लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. गुरूवारी (दि.२३) उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.

Increased tension of candidates in Lok Sabha elections | लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे वाढले टेन्शन

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे वाढले टेन्शन

ठळक मुद्देकार्यकर्त्यांमध्ये उत्साह : निकालाच्या अंदाजाची नव्याने केली जातेय उजळणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. गुरूवारी (दि.२३) उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. गडचिरोली-चिमूर मतदार संघात भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अशोक नेते आणि काँग्रेसचे उमेदवार तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांच्यात सरळ लढत झाल्याने दोघांपैकी कोण बाजी मारणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये वाढली आहे. दुसरीकडे या दोन्ही उमेदवारांचे टेन्शन काहीसे वाढले आहे. रिंगणातील इतर तीन उमेदवार आपल्याला किती मतांचा कौल मिळेल या विचाराने टेन्शनमध्ये आले आहेत.
जिल्ह्यातील ९३५ मतदान केंद्रांवर गेल्या ११ एप्रिल रोजी मतदान झाले होते. नवमतदारांसह वृद्ध व दिव्यांगांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे नक्षल दहशत असूनही मतदानाची टक्केवारी विदर्भात सर्वाधिक म्हणजे ७१.९८ वर गेली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या लोकसभा क्षेत्रात ६९.८८ टक्के मतदान झाले होते. त्यापेक्षाही यावेळी मतदान जास्त झाल्यामुळे मतदारांच्या मनात नेमके काय याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. मतदानात अडथळे आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी दोन दिवसात तीन भूसुरूंग स्फोट घडविण्यासोबतच पोलिसांवर फायरिंगही झाली. परंतू तरीही नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. ग्रामीण भागात वाढलेली ही मतदानाची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता वाढली आहे.
या निवडणुकीत भाजप-सेना युतीचे अशोक नेते, काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीचे डॉ.नामदेव उसेंडी, वंचित बहुजन आघाडीचे डॉ.रमेशकुमार गजबे, बसपाचे हरिचंद्र मंगाम आणि आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे देवराव नन्नावरे या पाच उमेदवारांनी आपले नशिब आजमावले. मात्र खरी लढत नेते आणि उसेंडी या दोनच उमेदवारांमध्ये झाल्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आपलाच उमेदवार जिंकणार असा विश्वास त्यांच्यात दिसत आहे.
विजयोत्सव साजरा करण्याची तयारी
मतदानानंतर निकालासाठी तब्बल सव्वा महिना वाटप पहावी लागली. आता एकदाचा कधी विजयोत्सव साजरा करतो, या आशेने दोन्ही प्रमुख उमेदवारांचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. कमी फरकाने का होईना, आपलाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास काही कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. विजयाचा जल्लोष करण्याची तयारीही त्यांनी केली आहे. परंतू त्यांचा हिरमोड तर होणार नाही ना, याची चिंताही उमेदवारांना व प्रमुख कार्यकर्त्यांना लागली आहे.
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
मतमोजणीची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मतमोजणीचे ठिकाण असलेल्या शासकीय कृषी महाविद्यालयाला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. जवळपास ७०० वर कर्मचारी मतमोजणीच्या कामासाठी सज्ज झाले आहेत. मतमोजणीच्या २५ फेºया आणि पाच व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास संध्याकाळ होणार आहे. मात्र प्रत्येक फेरीतील मतांच्या आघाडीवरून कोण बाजी मारणार याचा अंदाज आधीच येऊ शकेल.

Web Title: Increased tension of candidates in Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.