Increased milk capacity due to fridgeval cow | फ्रिजवल गायीमुळे वाढते दुधाची क्षमता
फ्रिजवल गायीमुळे वाढते दुधाची क्षमता

ठळक मुद्देवडसाच्या वळूमाता संगोपन केंद्रात १०० गायी दाखल

अतुल बुराडे/विष्णू दुनेदार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा/तुळशी : देसाईगंज येथील वळूमाता संगोपन केंद्रात पुणे व नाशिक येथून फ्रिजवल जातीच्या १०० गायी आणण्यात आल्या असून ही संकरीत गाय असल्याने या गायीची रोगप्रतिकारक शक्ती मोठी आहे. या गायीमुळे दुधाची क्षमता वाढली असून दूध संकलनाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी बांधव व बेरोजगारांना दूध उत्पादनातून जोडधंदा मिळावा, या उद्देशाने देसाईगंज-कुरुखेडा मार्गावर चार किमी अंतरावरील विसोरानजीक तब्बल २१६ हेक्टर जागेवर सन १९७४-७५ साली वळू माता संगोपन केंद्र स्थापन करण्यात आले. सुरूवातीला या ठिकाणी आस्ट्रेलिया येथून विदेशी होल्स्टन जातीच्या गायी आणल्या गेल्या. पुढे वातावरण बदलामुळे यात बदल करण्यात आला व १९८७ ला साहिवल जातीच्या गायीचे संगोपन केंद्र म्हणून घोषित करण्यात आले. सद्य:स्थितीत येथे साहिवल जातीच्या ७३ व इतर १०५ गायी आहेत. नाशिक व पुणे येथून फ्रिजवल जातीच्या १०० गायी काही दिवसांपूर्वीच येथे आणल्या असून त्यांची योग्यरित्या देखभाल केली जात आहे. फ्रिजवल ही संकरित गाय असून तिची रोगप्रतिकारक शक्ती उच्च आहे. नाशिक व पुणे येथील मिलिटरी डेहरी फार्म बंद झाल्याने तेथील फ्रिजवल जातीच्या १०० गायी राज्य शासनाने विसोरानजीकच्या वळूमाता केंद्रात पाठविल्या असल्याची माहिती आहे. नाशिक येथून ६० व पुणे येथून ४० अशा १०० फ्रिजवल गायी या केंद्रात आणण्यात आल्या आहेत.

Web Title: Increased milk capacity due to fridgeval cow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.