वनविभागावर वाढला रिक्त पदांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST2021-04-19T04:33:40+5:302021-04-19T04:33:40+5:30

आलापल्ली : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात २ हजारांपेक्षा अधिक वनकर्मचाऱ्यांची ...

Increased load of vacancies on forest department | वनविभागावर वाढला रिक्त पदांचा भार

वनविभागावर वाढला रिक्त पदांचा भार

आलापल्ली : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात २ हजारांपेक्षा अधिक वनकर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत चालला असून लाकूड तस्करी थांबविणे अशक्य झाले आहे.

डास व कीटकांमुळे आरोग्य धोक्यात

एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपनस्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी डास व किटकांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपरिषदेने फवारणी करून डास व कीटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.

मोहझरीतील रस्त्यांवर खड्डेच- खड्डे

गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. सदर रस्ते दुरुस्त करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणने बनला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

भंबारा चौकात अपघात वाढले

आलापल्ली : येथील सिरोंचा पुलाजवळ असलेल्या भंबारा चौकात भामरागड, चंद्रपूर, आलापल्ली व अहेरी हे चारही मुख्य मार्ग एकत्र येतात. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बांधणे आवश्यक आहे. मात्र, गतिरोधक नसल्याने सदर चौकात अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे.

विना विमा वाहनांवर कारवाईच नाही

भामरागड : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र, वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत.

सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक

देसाईगंज : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, विद्युत कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

गांधी सभागृहाच्या मागे घाणीचे साम्राज्य

गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहाच्या मागील परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून याकडे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील दुकानदार याच ठिकाणी लघुशंकेसाठी जातात व दुकानातील कचराही नेऊन टाकतात. यामुळे दुर्गंधी वाढली आहे.

अतिक्रमणामुळे सिंचन क्षेत्रात घट

रांगी : परिसरातील मोहली, महावाडा, निमनवाडा गावातील अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. सदर अतिक्रमण हटवावे.

डुकरांच्या बंदोबस्ताकडे पालिकेचे दुर्लक्ष

गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र, पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकराच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.

निकतवाडा परिसरात कव्हरेजची समस्या

घोट : परिसरातील निकतवाडा परिसरात बीएसएनएल व अन्य खासगी कंपन्यांचे ग्राहक आहेत. या भागातील अनेक मोबाईलधारक इंटरनेटचा वापर करतात. परंतु, कव्हरेज विस्कळीत होत असल्याने ऑनलाईन कामे रखडत आहेत. सातत्याने मागणी करूनही सुधारणा करण्यात आली नाही.

मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना धोका

भामरागड : दिवसेंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. स्थानिक नागरिकांनी या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा नगरपंचायतीकडे केली आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने कुत्र्यांची संख्या वाढत आहे.

कव्हरेज नसल्याने नागरिक त्रस्त

अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावांचा संपर्क आहे.

शाळा आवारात जनावरांचा वावर

आलापल्ली : अहेरी पंचायत समितीअंतर्गत दुर्गम गावातील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना अद्यापही पक्क्या स्वरूपाची संरक्षक भिंत उभारण्यात आली नाही. तसेच अनेक शाळांना प्रवेशद्वार उभारण्यात आले नाही. परिणामी, गावातील मोकाट जनावरे शाळा परिसरात जाऊन हैदोस घालत आहेत.

कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा

आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कृषी विभागावरचा रिक्त पदांचा भार वाढला

गडचिरोली : जिल्ह्यातील ९० टक्के जनता शेती व शेतीवर आधारित उद्योगावर आपली उपजीविका करीत आहे. मात्र, याही विभागात जवळपास २० टक्के पदे रिक्त आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील पदे रिक्त असल्याने या कार्यालयात प्रशासकीय कामकाजाची गती मंदावली आहे.

एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्त

एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावांत सौरदिवे लावण्यात आले. परंतु, अनेक गावांत लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे बेकामी झाले आहेत.

कैकाडी वस्तीत सुविधांचा अभाव

गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाजबांधवांची वस्ती आहे. या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत. मात्र, येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अनेक वर्षांपासून येथे आवश्यक प्रमाणात सोयीसुविधा अद्यापही पोहोचल्या नाहीत.

एकोडी- वेलतूर मार्गावर काटेरी झुडपे कायमच

चामोर्शी : तालुक्यातील एकोडी- वेलतूर तुकूम मार्गावरील दुतर्फा काटेरी झुडपांची वाढ मोठ्या प्रमाणावर झाल्याने या झाडांमुळे वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे सदर झुडपे तोडण्याची गरज आहे. फांद्या रस्त्यावर येत असल्याने विरुद्ध दिशेने येणारे वाहन दिसण्यास अडथळा होत आहे.

हेमाडपंती शिव मंदिर जीर्णावस्थेत

गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंती आहे. या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते. या मंदिरातून भूयार जात असून तो भूयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघतो, अशी आख्यायिका आहे.

येवली येथे जलद बसला थांबा द्या

गडचिरोली : येथून जवळच असलेल्या येवली येथे जलद बसथांबा आहे. मात्र, गडचिरोली आगाराच्या बसगाड्याव्यतिरिक्त इतर आगाराच्या जलद बसगाड्या येथे थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांना गडचिरोली आगारात बसगाडी बदलावी लागत आहे.

Web Title: Increased load of vacancies on forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.