वर्दळीच्या रस्त्यावर वाढले अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST2021-09-19T04:37:34+5:302021-09-19T04:37:34+5:30
ग्रामीण भागात विजेचा लपंडाव कुरुड (काेंढाळा) : सध्या ग्रामीण भागातील अनेक गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास ...

वर्दळीच्या रस्त्यावर वाढले अतिक्रमण
ग्रामीण भागात विजेचा लपंडाव
कुरुड (काेंढाळा) : सध्या ग्रामीण भागातील अनेक गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच अनेक विद्युत तारा लोंबकळल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे थोडी हवा आली तरी विद्युत पुरवठा खंडित होतो. कृषिपंपधारक शेतकरी रबी पिकाची तयारी करीत आहे. अशावेळी अखंडित वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. याकडे वीज वितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो
सिराेंचा : जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या गावातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, ग्रामपंचायत, तलाठी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कृषी विभाग, वीज कर्मचारी, पंचायत समिती, तहसील कार्यालय व इतर क्षेत्रात कार्यरत काही कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे सामान्य नागरिकांची कामे खोळंबत आहेत.
जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्र अत्यल्प
वैरागड : जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्र तोकडे आहेत. परिणामी, महा-ई-सेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ७० किमीचे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. महा-ई-सेवा केंद्रामुळे लोकांना घरबसल्या दाखले मिळणार असले तरी ही सेवा इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर अवलंबून आहे. अहेरी उपविभागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा माेठा अभाव आहे. टाॅवर असूनही कव्हरेज राहत नाही.
निराधार योजनेचे अनुदान प्रलंबित
रांगी : मागील दाेन ते तीन महिन्यांपासून श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान थकीत आहे. परिणामी लाभार्थ्यांना अडचण जात आहे. कोरोनामुळे लाभार्थ्यांना आर्थिक चणचण भासत आहे. लाभार्थी बँकेत दररोज पैशासाठी चकरा मारत आहेत. मात्र पैसे आले नसल्याने त्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे. सातत्याने मागणी करूनही निराधार याेजनेच्या अनुदानाच्या कामात गती आली नाही.
राजस्व अभियान सुरू ठेवण्याची मागणी
जाेगीसाखरा : तालुका प्रशासनाच्या वतीने तहसील कार्यालयात राजस्व अभियान राबविण्यात येत होते. या अभियानामुळे परिसरातील नागरिकांना विविध प्रकारचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तहसील कार्यालयातील दैनंदिन कामकाजामुळे अनेक प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने त्यांना कागदपत्र लागणार आहेत.
डुकरांच्या बंदोबस्ताकडे पालिकेचे दुर्लक्ष
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र, पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकराच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
शाळा आवारात जनावरांचा वावर
आलापल्ली : अहेरी पंचायत समितीअंतर्गत दुर्गम गावातील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना अद्यापही पक्क्या स्वरूपाची संरक्षक भिंत उभारण्यात आली नाही. तसेच अनेक शाळांना प्रवेशद्वार उभारले नाही. परिणामी, गावातील मोकाट जनावरे शाळा परिसरात जाऊन हैदोस घालीत आहेत.
कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी हाेत आहे.