उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी जि.प. करणार गाळेबांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:42 IST2021-02-20T05:42:30+5:302021-02-20T05:42:30+5:30
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरातील जिल्हा परिषदेच्या इमारतीपासून राष्ट्रीय महामार्गापर्यंत असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रशस्त जागेवर बीओटी तत्त्वावर गाळ्यांचे बांधकाम केले ...

उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी जि.प. करणार गाळेबांधकाम
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरातील जिल्हा परिषदेच्या इमारतीपासून राष्ट्रीय महामार्गापर्यंत असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रशस्त जागेवर बीओटी तत्त्वावर गाळ्यांचे बांधकाम केले जाणार आहे. बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत चाललेल्या सर्वसाधारण सभेत याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. याशिवाय विविध कामांचे ठराव घेण्यात आले.
जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, सभापती युधिष्ठीर बिश्वास, प्रा. रमेश बारसागडे, रोशनी पारधी, रंजिता कोडाप आदींसह सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि विभाग प्रमुख उपस्थित होते.
दुपारी १.३० वाजता सुरू झालेल्या या सभेत अनेक विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून रिकाम्या पडून असलेल्या जागेवर गाळ्यांचे आणि हॉलचे बांधकाम करून उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. यात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती राहणाऱ्या जिल्हाभरातील रुग्णांच्या नातेवाइकांची निवास व्यवस्था होण्यासाठी एका हॉलचेही बांधकाम केले जाणार आहे. हे सर्व बांधकाम बीओटी तत्त्वावर करण्याचा ठराव घेण्यात आला.
याशिवाय पाणंद रस्त्यांवर ३३ कोटींच्या नवीन ब्रिज कम बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. जुन्या मंजूर असलेल्या १० कोटींच्या बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यावर चर्चा झाली. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्गखोल्या आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १८ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. नव्याने १५० अंगणवाड्यांच्या बांधकामांनाही मंजुरी देण्यात आली. आरोग्य उपकेंद्रांची दुरुस्ती, कंपाऊंडचे बांधकाम, अपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्रांचे काम पूर्ण करण्यासाठी या सभेत निधी मंजूर करण्यात आला.