रस्त्यांची रूंदी वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST2021-04-21T04:36:08+5:302021-04-21T04:36:08+5:30
आरमोरी : तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील रस्त्यांची रुदी अत्यंत कमी आहे. या रस्त्यांवरून एकच वाहन जाऊ शकते. दुसरे ...

रस्त्यांची रूंदी वाढवा
आरमोरी : तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील रस्त्यांची रुदी अत्यंत कमी आहे. या रस्त्यांवरून एकच वाहन जाऊ शकते. दुसरे वाहन जातेवेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्त्यांची रुंदी वाढविण्याची मागणी होत आहे.
बँकेअभावी अडचण
धानोरा : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा नाहीत. धानोरा तालुक्यातील नागरिकांना व्यवहार करण्याकरिता तालुका मुख्यालयात यावे लागते. तालुक्यात मुंगनेर, पेंढरी येथे बँकेची गरज आहे. राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने मुंगनेर, पेंढरी भागातील नागरिकांना पायपीट करावी लागते.
बसथांब्यानजीक शौचालय बांधा
चामोर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी बसथांब्यावर भेंडाळा, मूल, चामोर्शी, आष्टी, गोंडपिंपरी व चपराळा आदी ठिकाणासाठी दररोज बसेस जातात. या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे येथे शौचालय व मुत्रीघर उभारण्यात यावे, अशी मागणी हाेत आहे.
तोडसा येथे भ्रमणध्वनी टॉवर उभारा
एटापल्ली : तालुक्यातील तोडसा येथे बीएसएनएल टॉवर उभारावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. एटापल्ली तालुक्यात बीएसएनएलचे कव्हरेज राहत नसल्याने नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन अनेक कामे करावी लागतात.
लाईनमनची पदे भरण्याची मागणी
एटापल्ली : वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या संख्येनुसार वीज कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. एटापल्ली तालुक्यातील लोकसंख्या विरळ आहे. त्यामुळे वीज सहायकाची कमी पदे मंजूर आहेत. तालुक्यातील बहुतांश गावे जंगलांनी वेढली आहेत. त्यामुळे लाईनमनची पदे भरावी.
कुत्रे, डुकरांचा त्रास वाढला
चामाेर्शी : चामाेर्शी शहरात माेकाट गुरे, ढाेरे रस्त्यावर खुलेआम फिरत असतात. त्यामुळे वाहनांना त्रास हाेताेच. परंतु छाेट्या-छाेट्या रस्त्यावर व माेहल्ल्या-माेहल्ल्यात कुत्र्यांचे जत्थे माेकाट फिरत असल्याने चामाेर्शीवासीय त्रस्त झाले आहेत. उपाययाेजना करण्याची मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
रोहित्रांमुळे धोका
गडचिरोली : ग्रामीण तसेच शहरातील बहुतांश शासकीय इमारतीच्या परिसरात विद्युत रोहित्र आहेत. बहुतांश रोहित्र उघडेच आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये येणाºया एखाद्या नागरिकाचा स्पर्श होऊन मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या समस्येकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
कोडसेपल्ली समस्याग्रस्त
अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे लक्ष देण्याची गरज आहे.
गतिरोधकाचा अभाव
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने गोगाव येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी वर्षभरापूर्वी अपघात झाला हाेता. त्यामुळे लवकर गतिराेधक निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
मूलभूत समस्याच भारी
कमलापूर : अहेरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथे सोयीसुविधांची भरमार असणे जनतेला अपेक्षित होते. परंतु कित्येक वर्षांपासून गावातील नागरिकांना मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मूलभूत समस्या साेडविण्याची मागणी हाेत आहे.
घरांची दुरुस्ती करा
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी ५०० घरांची स्वतंत्र कॉलनी वसविण्यात आली आहे. या कॉलनीतील घरांची दुरवस्था झाली आहे. अनेक घरांचे पडझड झाली असल्याने या घरांमध्ये राहणेही कठीण झाले आहे.
गावांचे पुनर्वसन रखडले
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशूंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे.
दत्तमंदिरात सुविधा द्या
आरमोरी : तालुक्यातील रामपूर चक येथे प्राचीन काळापासून दत्ताचे मंदिर आहे. मंदिरात शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. परंतु मंदिराच्या विकासाकडे दुर्लक्ष असून मंदिर परिसरात सोयीसुविधा देण्याची मागणी होत आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
वास्तूची दुरुस्ती करा
सिरोंचा : ब्रिटिशकालीन सत्ताकाळात सिरोंचा तालुका मुख्यालयी हवामान खात्याच्या अखत्यारित असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे. अनेक वर्षांपासून मागणी केली जात असतानाही दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
लाभ मिळण्यास दिरंगाई
आलापल्ली : गर्भवती व प्रसूत झालेल्या मातांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही.
दुग्ध योजना राबवा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दुधाळ जनावरांची संख्या घटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होत चालले आहे. सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात ७५ पेक्षा अधिक दुग्ध उत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. मात्र त्यातील ५० वर दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. त्यामुळे दुग्ध याेजना राबवावी.