काँग्रेसच्या मताधिक्यात वाढ

By Admin | Updated: October 19, 2014 23:37 IST2014-10-19T23:37:24+5:302014-10-19T23:37:24+5:30

आरमोरी विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचा १२ हजार ७३३ मतांनी विजय झाला असला तरी काँग्रेस पक्षाचे २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मताधिक्य ६ हजार ५०४ मतांनी वाढले.

Increase in Congress vote | काँग्रेसच्या मताधिक्यात वाढ

काँग्रेसच्या मताधिक्यात वाढ

देसाईगंज : आरमोरी विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचा १२ हजार ७३३ मतांनी विजय झाला असला तरी काँग्रेस पक्षाचे २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मताधिक्य ६ हजार ५०४ मतांनी वाढले. हे या निकालाने स्पष्ट केले आहे.
मागील १० वर्षापासून आनंदराव गेडाम हे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करीत आहे. यावेळीही पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. मागील १० वर्षात त्यांना राजकीय मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार हे मार्गदर्शन करीत होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघात आनंदराव गेडाम यांना ४१ हजार १७६ मते होती. यावेळी त्यांना ४७ हजार ६८० मते मिळाली आहे. म्हणजेच ६ हजार ५०४ मते वाढली आहे. मात्र यावेळच्या निवडणुकीत पोरेड्डीवारांनी गैरआदिवासींवरील अन्यायाच्या मुद्यावर काँग्रेसची साथ सोडली व ते भाजपवासी झाले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आरमोरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसमध्ये मोठे वादळ निर्माण झाले होते. पोरेड्डीवारांनी १२ आॅक्टोबर रोजी भाजपात प्रवेश घेतल्यानंतर अवघ्या दोन दिवसात आनंदराव गेडाम यांनी काँग्रेसचे सारे जुने नेते एकत्र करण्याचे काम केले. काँग्रेसचे आरमोरी तालुकाध्यक्ष किशोर वनमाळी, जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष जीवन नाट, माजी जि.प. सदस्य आनंदराव आकरे, माजी पं.स. सभापती परसराम टिकले, बगुजी ताडाम, ज्येष्ठ काँग्रेस नेते रविंद्र दरेकर, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्यासह देसाईगंज तालुकाध्यक्ष विलास ढोरे व चारही तालुक्यातील जुन्या शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांची काँग्रेससाठी मोट बांधली व आपला निवडणूक प्रचार सुरू ठेवला. पोरेड्डीवारांवर कुठलीही जाहीर टिकाटिपणी आनंदराव गेडाम यांनी केली नाही. काँग्रेसच्या प्रचाराच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी व प्रदेश सरचिटणीस हसनअली गिलानी पोरेड्डीवार परिवारावर टिकाटिपणी करीत राहिले. आदिवासी व गैरआदिवासी असा वाद आरमोरी विधानसभा क्षेत्रात उभा झाल्यानंतर संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील आदिवासी मतदार पुन्हा काँग्रेसच्या बाजुने एकवटला आहे. हे चित्र दिसून आले. कोरची, कुरखेडा तालुक्यात काँग्रेसला चांगले मताधिक्य मिळाले. याचा अर्थ आदिवासी मतदार व या भागातील पारंपारिक काँग्रेसचे मतदार तसेच गेडाम यांनी आपल्या १० वर्षाच्या कारकिर्दीत नव्याने काही जोडलेले लोक या भरवशावर काँग्रेसला या विधानसभा निवडणुकीत ४७ हजार ६८० मतापर्यंत मजल मारता आली. याचवर्षी एप्रिल महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघात काँगे्रेसला ४८ हजार २०८ मते मिळाली होती व या मतदार संघात भाजप हा ४२ हजार ६७७ मतांनी आघाडीवर होता. लोकसभा निवडणुकीत भाजपला या मतदार संघात पोरेड्डीवार काँग्रेसमध्ये असतानाही ९० हजार ८८५ मते मिळाली होती. काँग्रेसला ४८ हजार २०८ मते होती. अवघ्या सात महिन्यात लोकसभेच्या तुलनेत हिशोब केल्यास काँग्रेसचे केवळ ५२८ मते कमी झाले आहे. याचा अर्थ भाजपला या मतदार संघात नवे भिडू पक्षाला जोडूनही मताधिक्य वाढविण्यात फारसा फायदा झाल्याचे दिसत नाही. लोकसभेत भाजप उमेदवाराने घेतलेल्या मतापर्यंत भाजपला या निवडणुकीत पोहोचता आले नाही. गडचिरोलीत मात्र अभूतपूर्व कामगिरी केली. गेल्यावेळच्या मताधिक्यापर्यंत भाजप पोहोचला, असे भाजपच्या लोकांचे मत आहे. एकूणच या मतदार संघात काँग्रेसचे आनंदराव गेडाम यांनी एकट्याने लढलेली ही लढाई त्यांनी पराभूत झाले तरीही जिंकलेली आहे, असे जुने काँग्रेस नेते आता ठामपणे म्हणू लागले आहे. मोदी लाटेचा परिणाम साऱ्या महाराष्ट्रावरच झाला. त्यामुळे आरमोरी विधानसभा क्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही. आनंदराव गेडाम यांच्याविषयी असलेली मागील १० वर्षांची अ‍ॅन्टीइनकंबन्सी या मतदानामध्ये कुठेही दिसली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार निवडणुकीत बसलाच असावा. ही बाब त्यांना मिळालेले मताधिक्य स्पष्ट करते. त्यामुळे या मतदार संघात काँग्रेसला आता नव्याने बांधणी करून पुन्हा नवसंजीवनी देण्याची गरज आहे. ही बोलकी प्रतिक्रिया सर्वत्र उमटली आहे.

Web Title: Increase in Congress vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.