गैरसोयीवरून एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात हंगामा

By Admin | Updated: December 2, 2015 01:28 IST2015-12-02T01:28:54+5:302015-12-02T01:28:54+5:30

स्थानिक ग्रामीण रुग्णालयात विविध समस्या कायम असून येथील आरोग्यसेवा कोलमडली आहे. परिणामी रुग्णांची हेळसांड होत आहे.

Inconvenience at Atapalli rural hospital commotion | गैरसोयीवरून एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात हंगामा

गैरसोयीवरून एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात हंगामा


एटापल्ली : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात विविध समस्या कायम असून येथील आरोग्यसेवा कोलमडली आहे. परिणामी रुग्णांची हेळसांड होत आहे. या सर्व मुद्यांवरून रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात रुग्ण व नातेवाईकांनी जोरदार हंगामा केल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी सोमवारला रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली.
रुग्ण व नातेवाईकांचा जमाव वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद आकिनवार यांच्या निवासस्थानाकडे पोहोचताच डॉ. आकिनवार यांनी भ्रमणध्वनीवरून पोलिसांकडे या घटनेची तोंडी तक्रार केली.
गेल्या अनेक दिवसांपासून एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात महिला रुग्णांच्या वॉर्डातील दिवे व पंखे बंद आहेत. रुग्णांना योग्य व पुरेसा औषधोपचार पुरविल्या जात नाही. एकूणच या रुग्णालयाची आरोग्यसेवा पूर्णत: कोलमडली आहे. या सर्व मुद्यांवरून एटापल्ली नगरपंचायतीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष रमेश गंपावार, काँग्रेसचे पदाधिकारी मनोहर हिचामी, तेलकुंटवार रुग्णालयात आले. १५ ते २० नागरिकांसमवेत या सर्व पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या अधिपरिचारिकांना रुग्णालयातील समस्यांबाबत जाब विचारला. लहान मुलासोबत असलेल्या एका महिला रुग्णाला बेड का दिला नाही, अशी विचारणाही त्यांनी अधिपरिचारिकांकडे केली. त्यानंतर पदाधिकारी व रुग्णांनी आक्रमक पवित्रा घेऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकिनवार यांना रुग्णालयात बोलाविण्यास सांगितले. त्यानंतर येथील आरोग्य कर्मचारी डॉ. आकिनवार यांना बोलविण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाकडे गेले. दरम्यान डॉ. आकिनवार यांनी रुग्णालयात येण्यास स्पष्ट नकार दिला. डॉक्टरांची अशी बेजबाबदारपणाची वागणूक पाहून नगर पंचायतीचे उपाध्यक्ष रमेश गंपावार यांनी रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा एटापल्ली पं. स. चे सभापती दीपक फुलसंगे यांना रुग्णालयस्थळी बोलाविले. त्यानंतर पदाधिकारी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा जमाव डॉ. आकिनवार यांच्या निवासस्थानाकडे पोहोचला. जमाव पोहोचला असल्याचे पाहून तत्काळ वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकिनवार यांनी भ्रमणध्वनीवरून एटापल्लीचे ठाणेदार सुहास आव्हाड यांच्याकडे अराजकतत्त्वाचे लोक माझ्याकडे आले असल्याची तक्रार केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Inconvenience at Atapalli rural hospital commotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.