Incomplete construction; risk of accident | अपूर्ण बांधकाम;अपघाताचा धोका

अपूर्ण बांधकाम;अपघाताचा धोका

ठळक मुद्देकाम पूर्ण करण्याची मागणी : जोगीसाखरा-वैरागड मार्गावरील वळण

लोकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : जोगीसाखरा-वैरागड मार्गावरील एका वळणावर पुरामुळे खड्डा पडून दुरवस्था झाली. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. या समस्येबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच वळण रस्त्यावर संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे काम हाती घेण्यात आले. परंतु हे काम अर्धवट ठेवल्याने आता येथे अपघाताचा धोका बळावला आहे. अपूर्ण असलेले बांधकाम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वैरागड मार्गावरील एका वळणावर मोठा खड्डा पडला होता. हा खड्डा वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत होता. याबाबत दोन महिन्यांपूर्वी लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन वळण मार्गावर संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र रस्ता भरण्याच्या कामात दिरंगाई झाली. रस्त्याचे रूंदीकरण करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाने उशिर केला. संरक्षक भिंत व वाहून गेलेल्या ठिकाणी मुरमाऐवजी वैरागड-देलनवाडी मार्गावरील काढून फेकलेले डांबराचे पापुद्रे आणून खड्डा बुजविण्याचे काम सुरू केले. परंतु नागरिकांनी विरोध केल्याने खड्डे बुजविण्याचे काम बंद पाडले. तेव्हापासून आता पंधरा दिवसांचा कालावधी उलटला. मात्र येथे नव्याने मुरूम टाकण्यात आले नाही. वळण मार्ग असल्याने अवजड वाहने खड्ड्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वळण मार्गावरील खड्डे बुजवून अपूर्ण बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रूंदीकरणाची गरज
जोगीसाखरा-वैरागड मार्गावरून दिवसभर वाहनांची वर्दळ असते. येथून दुचाकी, चारचाकीसह अवजड वाहने ये-जा करीत असतात. देसाईगंज येथे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर नागरिक करतात. हा मार्ग जंगलातून गेला आहे. शिवाय अरूंद आहे व रस्त्याच्या कडा पूर्णत: खचलेल्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गाचे रूंदीकरण करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु मागणीकडे दुर्लक्षच होत आहे.

Web Title: Incomplete construction; risk of accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.