गोंडवानात सैनिकोत्सव, क्रीडा स्पर्धांचे थाटात उद्घाटन
By Admin | Updated: December 8, 2015 01:55 IST2015-12-08T01:55:52+5:302015-12-08T01:55:52+5:30
स्थानिक चामोर्शी मार्गावरील गोंडवाना सैनिकी विद्यालयात सोमवारी सैनिकोत्सव तथा क्रीडा स्पर्धांचे थाटात

गोंडवानात सैनिकोत्सव, क्रीडा स्पर्धांचे थाटात उद्घाटन
गडचिरोली : स्थानिक चामोर्शी मार्गावरील गोंडवाना सैनिकी विद्यालयात सोमवारी सैनिकोत्सव तथा क्रीडा स्पर्धांचे थाटात उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रदीप शिंदे तर अध्यक्षस्थानी गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य संजय भांडारकर उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन, सिंधूताई पोरेड्डीवार हायस्कूलच्या प्राचार्य कविता पोरेड्डीवार, वसंत विद्यालयाचे मुख्याध्यापक लाकडे, सीआरपीएफचे वरिष्ठ आरोग्य सेवक डॉ. वसंत कुमरे, तालुका क्रीडाप्रमुख म्हस्के, पालक प्रतिनिधी राकेश येनुगवार आदी उपस्थित होते.
क्रीडा मैदानाचे विधिवत पूजन करून, क्रीडाज्योत पेटवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे रितसर उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य कविता पोरेड्डीवार यांनी आयुष्यात यशाची उंची गाठायची असेल तर मनात सदैव सकारात्मक विचारांची रेलचेल असायला हवी, असे सांगितले.
डॉ. गणेश जैन म्हणाले, संघर्षानेच परिस्थितीवर सहज मात करता येते, त्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांनी नेहमी परिस्थितीशी सामोरे जाण्याची वृत्ती बाळगावी, यावेळी विद्यार्थ्यांनी केलेले पथसंचलनाचे कौतुक करीत, विद्यालयातील शिस्त, कार्यात झोकून देणारे कर्मचारी वृंद या विद्यालयाला लाभल्यामुळे सदर महाविद्यालय यशाच्या शिखरावर पोहोचले आहे, असेही डॉ. जैन यावेळी म्हणाले.
सैनिकोत्सव दरम्यान होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत प्रत्येक सहभागी खेळाडूंनी सांघिक भावनेने खेळ खेळावे, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रदीप शिंदे यांनी केले. यावेळी प्राचार्य संजय भांडारकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रूपेश बुरमवार, संचालन शाहादुल्ला खान यांनी केले तर आभार विद्यालयाचे क्रीडा शिक्षक भूपेंद्र चौधरी यांनी मानले. चंद्रशेखर आझाद व भगतसिंग हाऊसच्या संघात उद्घाटनीय सामना यावेळी घेण्यात आला.
१० डिसेंबर रोजी गुरूवारला सैनिकोत्सव कार्यक्रमादरम्यान सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून या विद्यालयातील इयत्ता १० वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा बक्षीस वितरण कार्यक्रमादरम्यान गौरव करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)