गोंडवन महोत्सवाचे उद्घाटन
By Admin | Updated: February 16, 2015 01:24 IST2015-02-16T01:24:06+5:302015-02-16T01:24:06+5:30
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गडचिरोली यांच्याद्वारे आयोजित महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वंयसहाय्यता ...

गोंडवन महोत्सवाचे उद्घाटन
गडचिरोली : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गडचिरोली यांच्याद्वारे आयोजित महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वंयसहाय्यता गटांच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक गोंडवन महोत्सव २०१५ चे आज रविवारी गडचिरोली येथे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी पाठ फिरविली. पालकमंत्री येणार म्हणून तब्बल साडेतीन तास या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा विलंबाने सुरू करण्यात आला. अखेरीस पालकमंत्र्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत तीन-साडेतीन तास उशीरा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन गडचिरोलीचे आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांधकाम व नियोजन सभापती अतुल गण्यारपवार होते.
जिल्हा परिषद यंत्रणेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येत असलेल्या या गोंडवन महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, उपाध्यक्ष जीवन नाट यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी पाठ दाखविली. याशिवाय डॉ. देवराव होळी वगळता जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला आला नाही. त्यामुळे महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिराश झाला. या उद्घाटन सोहळ्यात जिल्हा प्रशासनाच्या तसेच जिल्हा परिषदेच्या कार्यप्रणालीवर आ. डॉ. देवराव होळी यांनी जाहिररित्या टिकाटिपणी केल्यामुळे अधिकारीही कमालीचे नाराज झाल्याचे चित्र दिसून आले. हा महोत्सव १९ फेब्रुवारीपर्यंत गडचिरोली येथे चालणार आहे. उद्या १६ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वाजता मधुबन संच आलापल्लीचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक शिवशंकर भारसाकळे हजर होते. (स्थानिक प्रतिनिधी)