नापिकीत कर्जवसुलीचा तगादा
By Admin | Updated: January 24, 2016 01:10 IST2016-01-24T01:10:13+5:302016-01-24T01:10:13+5:30
यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दरवर्षीच्या तुलनेत एकूण उत्पादनापैकी २० ते ३० टक्केच उत्पादन हाती आले आहे.

नापिकीत कर्जवसुलीचा तगादा
कर्जाचा भरणा करा, दिला दम! : बँकेच्या वसुली पथकाची शेतकऱ्यांच्या दारावर धडक
गोपाल लाजुरकर गडचिरोली
यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दरवर्षीच्या तुलनेत एकूण उत्पादनापैकी २० ते ३० टक्केच उत्पादन हाती आले आहे. शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती पाहता, शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील १३९८ गावांमध्ये दुष्काळ घोषित केला. मात्र राष्ट्रीयकृत, सहकारी बँका व पतसंस्थांच्या कर्जवसुली पथकांच्या वतीने शेतकऱ्यांच्या दारी धडक देऊन कर्जाचा भरणा करण्यासाठी सांगितले जात आहे. नापिकीतही शेतकऱ्यांना बँकाकडून कर्जाचा भरणा करण्याचा तगादा लावला जात आहे.
यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पिकाकरिता राष्ट्रीयकृत, सहकारी बँका व पतसंस्थांच्या माध्यमातून कर्ज उचलले होते. मात्र निसर्गाने साथ न दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरवर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेत २० ते ३० टक्केच उत्पादन झाले, अशी स्थिती असल्यामुळे शेतकरी खरीप हंगामासाठी बँका व पतसंस्थांकडून उचल केलेल्या कर्जाचा भरणा कसे करणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. परंतु बँकांच्या कर्ज वसुली पथकांकडून शेतकऱ्यांना गृहभेटी देऊन तसेच पत्र पाठवून ३० जानेवारीपर्यंत कर्जाचा भरणा करावा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असे बजाविले जात आहे. त्यामुळे शेतकरी उद्विग्न होत असून कर्जाचा भरणा कसा करावा या विवंचनेत आहे.
थकीत कर्जदार बँकेच्या टार्गेटवर
मागील तीन-चार वर्षांपासून पावसाचा अनियमितपणा यामुळे नापिकीचे दृष्टचक्र शेतकऱ्याच्या भोवती फिरत आहे. त्यामुळे दोन ते तीन वर्षांपूर्वी घेतलेले बँकांचे कर्ज शेतकरी भरू शकले नाही. अशा थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात मोठी आहे. यंदाही नापिकीचे प्रचंड सावट असल्याने कर्ज भरण्याची त्यांची क्षमताच राहिलेली नाही, अशा थकबाकीदार शेतकऱ्यांची बँकांनी स्वतंत्र यादी तयार केली असून बँकांचे कर्ज वसुली पथक मार्च २०१६ पर्यंत ही वसुली करण्याच्या कामानिमित्त शेतकऱ्यांच्या दारावर पोहोचत आहे. बँकेचे पथक घरी आल्यामुळे असलेल्या कर्जाचे हप्ते पाडून देण्याची विनंती शेतकरी करीत आहे. मात्र त्याच्यावरची असलेली थकबाकी पाहून बँकेच्या पथकातील अधिकारी याबाबत निर्णय घेत असल्याचे लोकमतने चौकशी केल्यावर निदर्शनास आले. काही शेतकरी दोन ते पाच हजार रूपयांपर्यंतची रक्कम देण्याची तयारी दाखवत असले तरी बँकेचे अधिकारी मात्र मोठ्या रकमेच्या भरण्यासाठीच आग्रही असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या पठाणी पध्दतीमुळे शेतकरी पूरता खचलेला आहे. ३१ मार्चपर्यंत वसुलीचे टार्गेटही बँका पूर्ण करण्याच्या कामी लागलेल्या आहेत.
२९ हजार शेतकऱ्यांना खरिपाचे कर्ज वितरण
२०१५ च्या खरीप हंगामात २९ हजार खातेदार शेतकऱ्यांना १० बँकांनी ११२ कोटी २५ लाख रूपयांचे कर्ज वितरण केले आहे. गेल्या महिन्यापर्यंत केवळ ५० लाख रूपयांच्या कर्जाची वसुली बँकांनी केली, अशी माहिती मिळाली होती. याशिवाय जवळपास ५० कोटीच्या आसपास थकीत कर्जही आहे. त्याच्या वसुलीसाठी बँकांचा प्रचंड तगादा शेतकऱ्यांच्या उरावर आहे. दुष्काळग्रस्त गावात कर्ज वसुली मोहीम थांबविण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र असे चित्र गडचिरोली जिल्ह्यात कुठेही दिसून येत नाही. चंद्रपूर जिल्ह्याच्याही अनेक बँकांचे कर्जवसुली पथक जिल्ह्यात दाखल झालेले आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांकडील कर्ज वसुली नोव्हेंबर महिन्यापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांना नोटीस पाठविण्यात येत आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे चालू वर्षाचे पीक कर्ज आहे. त्यांना पत्र पाठवून ३१ मार्चपूर्वी कर्ज भरून शासनाच्या शून्य टक्के पीक कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. चालू वर्षाचे ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज आहे. त्यांना पाठविलेली नोटीस नसून तो पत्र आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
- सतीश आयलवार
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोली