बाजारपेठेत संकरित आंब्यांचाच बाेलबाला, गावठी झाले गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST2022-05-23T05:00:00+5:302022-05-23T05:00:51+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : वातावरणातील बदलामुळे यावर्षी गावठी आंबे फारशा प्रमाणात आले नाहीत. त्यामुळे बाजारात गावठी आंब्यांचे दर्शन ...

बाजारपेठेत संकरित आंब्यांचाच बाेलबाला, गावठी झाले गायब
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : वातावरणातील बदलामुळे यावर्षी गावठी आंबे फारशा प्रमाणात आले नाहीत. त्यामुळे बाजारात गावठी आंब्यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. शहरात केवळ संकरित आंब्यांची चलती असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या कालावधीत संकरित आंब्यांकडे शहरी ग्राहक वळत चालला असला तरी ग्रामीण भागातील ग्राहकाला अजूनही गावठी आंबाच पसंत पडतो. ग्रामीण भागातून शहरात आलेल्या नागरिकांना गावठी आंब्याचे विशेष आकर्षण आहे. त्यामुळे जास्तीचे पैसे देऊन आंबा खरेदी करण्यास तयार हाेतात. ग्रामीण भागातील काही नागरिक गावठी आंबे विक्रीसाठी शहरात आणतात. मात्र मे महिन्याचा दुसरा आठवडा उलटूनही अजूनपर्यंत गावठी आंबे बाजारात आले नाहीत. फेब्रुवारी महिन्यात आलेल्या जाेरदार पावसामुळे वातावरणात बदल हाेऊन याचा परिणाम आंब्यांच्या फळधारणेवर झाला.
बेगमपल्ली १०० रूपये किलाे
बेगमपल्ली आंबा आकाराने माेठा राहतो. तसेच रस अतिशय घट्ट हाेतो. रस बनविण्यासाठी बेगमपल्ली आंबा सर्वात चांगला मानला जाताे. त्यामुळे रस बनविण्यासाठी हाच आंबा खरेदी करतात. सध्या हा आंबा १०० रूपये किलाे दराने बाजारात उपलब्ध आहे.
बेंगमपल्ली, दसेरीची चलती
सध्यास्थितीत गडचिराेलीच्या बाजारात बेंगमपल्ली, दसेरी व लंगडा या तीन संकरित आंब्यांची चलती असल्याचे दिसून येते.
बेंगमपल्ली आंबा रस बनविण्यासाठी तर दसेरी व लंगडा हे आंबे चाेखून खाण्यासाठी वापरले जातात. गावठी आंब्यांच्या तुलनेत हे आंबे गाेड राहतात.
इतर प्रकारचे आंबे गडचिराेली जिल्ह्यातील नागरिक सहजासहजी खरेदी करीत नाही.
गावठीची चव खाल्ल्याशिवाय कळत नाही
गावठी आंब्याचे विविध प्रकार आहेत. काही आंबे आंबट, तेलकट, गाेड राहतात. त्यामुळे विश्वास ठेवून गावठी आंबा खरेदी न करता पहिले एखादा आंबा चव घेऊन बघावा. त्यानंतरच आंबा खरेदी करावा. संकरित आंब्यांचेही अनेक प्रकार असले तरी हे आंबे सहज ओळखता येतात. त्यामुळे रस बनविण्यासाठी की, चाेखण्यासाठी आंबे खरेदी करायचे आहेत. त्यानुसार आंब्यांची निवड करावी.