क्वॉलिटी सर्कल योजनेतून एसटी सेवा सुधारणार
By Admin | Updated: May 31, 2015 01:21 IST2015-05-31T01:21:56+5:302015-05-31T01:21:56+5:30
स्वच्छतेकडे मानव आकर्षित होऊन गर्दीही वाढण्यास मदत होईल, हा उद्देश ठेवून राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना आकर्षित करुन अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी ...

क्वॉलिटी सर्कल योजनेतून एसटी सेवा सुधारणार
गडचिरोली : स्वच्छतेकडे मानव आकर्षित होऊन गर्दीही वाढण्यास मदत होईल, हा उद्देश ठेवून राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना आकर्षित करुन अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी क्वॉलिटी सर्कल योजना राबविण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील आगारनिहाय दोन ग्रुप तयार करण्यात आले असून एका ग्रुपमधील पाच ते सहा अधिकारी, कर्मचारी बसची स्वच्छता तथा बसमधील तांत्रिक दोष, प्रवाशाच्या अडचणी जाणून घेणार आहेत. तांत्रिक दोषाच्या दुरुस्तीमुळे लोकवाहिनीचे आरोग्य सुदृढ राहण्यास या क्वॉलिटी सर्कलचा वापर होणार आहे.
'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने अधिकाधिक प्रवाशांनी लोकवाहिनीतून प्रवास करावा म्हणून यापूर्वीही अनेक उपक्रम राबविले आहेत. वाहकांनी, चालकांनी प्रवाशांना मदत करणे, वाहकांनी बसमध्ये प्रवाशांचे स्वागत करणे असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. यापुढे एक पाऊल टाकून क्वॉलिटी सर्कल हा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने हाती घेतला आहे.
या उपक्रमानुसार गडचिरोली विभागांतर्गत अहेरी, ब्रह्मपुरी व गडचिरोली आगारामध्ये सर्कलनिहाय दोन ग्रुप स्थापन करण्यात आले आहेत.
या सर्कलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन शिफ्टमध्ये काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा ग्रुप आगारातील देखभाल झालेल्या बसेस स्वच्छ आहेत की नाही, याची खातर जमा करणे, स्वच्छतेबरोबर येणाऱ्या अडचणी सोडविणे अडचणीवर चर्चा करुन तोडगा काढणे, तसेच सर्व बसेस अधिकाअधिक स्वच्छ होऊन बाहेर पडतील, ही जवाबदारी या ग्रुपवर देण्यात आली आहे. दुसरा ग्रुप तयार करण्यात आले आहे. हा ग्रुप बसेसचे सहामाही डाकींग, आरटीओ, आरसी पासींग हेवी बॉडी रिपेअर व अपघात दुरुस्तीची कामे करणार आहे.
विभागीय कार्यशाळेत वाहनाच्या दुरुस्तीचा दर्जा उंचावल्यानंतर मार्गावर होणारे बिघाड कमी होणार आहेत. शिवाय आगारात येणाऱ्या बसेसची पाहणी करणे, चालकांनी सांगितलेल्या त्रुटी दुरुस्त करुन बस आगाराबाहेर काढण्याची जबाबदारी या ग्रुपवर देण्यात आली आहे. एकूणच प्रवाशांना आकर्षीत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने हा आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात आगारनिहाय सर्कलमधून अधिकारी व कर्मचारी यांनी काळजीपूर्वक कार्य केल्यास लोकवाहिनीचे आरोग्य सुदृढ होवून एसटी चकाचक दिसणार आहे. यामुळे प्रवाशांना चांगली सेवा मिळून महामंडळालाही लाभ होण्यास मदत होणार आहे. यातून प्रवाशांचा एसटी प्रवासाकडे कल वाढण्याचे ध्येय आहे. (स्थानिक प्रतिनिधी)