यंत्रयुगातही शेतकऱ्यांच्या सांजोनीचे महत्त्व कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:39 AM2021-04-23T04:39:10+5:302021-04-23T04:39:10+5:30

तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतजमीन आहे. या जमिनीतून मुखत्वे दोन पिके घेतली जातात, त्यात खरीप व रब्बी पिके शेतकरी घेत ...

The importance of farmer's sanjoni remains even in the machine age | यंत्रयुगातही शेतकऱ्यांच्या सांजोनीचे महत्त्व कायम

यंत्रयुगातही शेतकऱ्यांच्या सांजोनीचे महत्त्व कायम

Next

तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतजमीन आहे. या जमिनीतून मुखत्वे दोन पिके घेतली जातात, त्यात खरीप व रब्बी पिके शेतकरी घेत असतात. यासाठी शेतकरी दरवर्षी शेतातील खरीप व रब्बी हंगाम संपल्यावर पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकरी सांजोनी करून पुढील हंगामाचा श्री गणेशा करतात यासाठी शेतकरी साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडवा (मांडवस)चा चांगला मुहूर्त आहे म्हणून बहुतांश शेतकरी या दिवशी सांजोनी करीत असतात. यासाठी शेतकरी वखराला नवीन दोरखंड तसेच वखरांची दुरुस्ती सुताराकडून करवून घेतात. एवढेच नव्हे तर बैलजोडी चांगली सजविली जाते. घरी पूजा करून ते बैलजोडी जुंपलेले वखर शेतात घेऊन जात शेतजमिनीत चार-पाच वखरणीचे फेरे मारतात त्यानंतर घरून घेऊन गेलेल्या शिदोरीचा आस्वाद शेतांच्या बांधावर मोठ्या भक्तिभावाने घेतला जातो. सांजोनी शेतकरी मुखत्वे गुढीपाडव्याला किंवा अक्षयतृतीया या दोन दिवशी अधिक शेतकरी सांजोनी करीत असतात.

बाॅक्स.....

शेतकामाचे भूमिपूजन

आमच्या वाडवडिलांपासून आमच्या घरात सांजोनी केली जात असते. हा दिवस म्हणजे साधारण घरात एक सणच असतो या कामासाठी घरातील सर्वच जण मदत करीत असतात. एकप्रकारे सांजोनी म्हणजे आम्हा शेतकऱ्यांच्या शेतातील हंगाम सुरू होण्यापूर्वी केलेले भूमिपूजनच आहे, असे नागपूर चक येथील शेतकरी तुळशीराम गाेहणे यांनी सांगितले.

ट्रॅक्टरचा वापर वाढला

सांजोनीची वेळ साधारणतः ५ वाजता असते. या सुमारास सांजोनी करणे शेतकऱ्यांना अधिक सोयीचे ठरत असते. सध्या ग्रामीण भागात शेती कामासाठी टॅक्टर या साधनांचा अधिक वापर केला जात असतो त्यामुळे दिवसेंदिवस जनावरांची संख्या कमी झालेली आहे. मात्र काही शेतकरी अशाही परिस्थितीत बैलजोडी वापरत आहेत. बैलजोडी असणारे ग्रामीण भागातील सर्वच शेतकरी सांजोनी करीत असतात. यंत्रयुगातही शेतकऱ्यांच्या सांजोनीचे महत्त्व कायम आहे.

Web Title: The importance of farmer's sanjoni remains even in the machine age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.