कुपोषित भागामध्ये परसबाग योजना राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:36 IST2021-05-26T04:36:07+5:302021-05-26T04:36:07+5:30
गडचिरोली : आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाड ...

कुपोषित भागामध्ये परसबाग योजना राबवा
गडचिरोली : आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देणारी योजना राबविली जात होती. आता मात्र या योजनेकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. सदर योजना पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे.
बांधकाम साहित्यामुळे रहदारीस अडथळा
गडचिरोली : शहरात विविध भागांत घराचे बांधकाम सुरू असून बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी सळाख तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते; शिवाय रस्त्यावरच विटा, रेती, गिट्टी, सळाख आदी साहित्यही ठेवले आहे. मात्र याकडे न.प.चे दुर्लक्ष आहे.
दुर्गम भागांत कर्मचारी राहतच नाही
धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागांत कार्यरत व दररोज अपडाऊन करत आहेत. हे कर्मचारी दुर्गम भागांत राहतच नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडत आहेत.
चपराळा येथे सोयी-सुविधा पुरवा
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र, याठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे. चपराळा येथे भेट देणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या वाढली आहे.
हूक टाकून विजेची चोरी सुरूच
वैरागड : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे महावितरणने लक्ष देण्याची मागणी सूज्ञ ग्राहकांकडून होत आहे. मुलचेरा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रमाण अधिक आहे.
उपाहारगृहांमधील पदार्थ उघड्यावर विक्रीला
गडचिरोली : शहरासह अनेक तालुका मुख्यालयाच्या उपाहारगृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, याकडे अन्न व पुरवठा विभागातर्फे कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
लिलावाअभावी वाहने गंजण्याची शक्यता
गडचिरोली : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेले वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणांमुळे किंवा कागदपत्रांअभावी अनेक पोलीस ठाण्यामध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. त्यामुळे वाहनांचा लिलाव करावा, अशी मागणी होत आहे.
पशुधन सांभाळताना पशुपालक त्रस्त
अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र, बऱ्याचशा पशुपालकांकडे हाडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. अनेक शेतकरी असे पशुधन विकण्याच्या तयारीत आहे. पशुधन घटल्याने दुग्ध व्यवसायावरही परिणाम झाला आहे.
हेमाडपंथी शिवमंदिर जीर्णावस्थेत
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंथी आहे. अमिर्झापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते. या मंदिरातून भुयार जात असून ते भुयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघते, असे सांगितले जाते.
योजनांच्या माहितीसाठी केंद्र निर्माण करा
कुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.
कन्नमवार नगरात डासांचा प्रादुर्भाव वाढला
गडचिरोली : कन्नमवार नगरातील अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कॅम्प एरियात नियमित डास प्रतिबंधक फवारणी करावी.
आकाशवाणी केंद्र निर्मितीचे काम थंडावले
गडचिरोली : गडचिरोली येथे आकाशवाणी केंद्र उभारण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनंतर केंद्र सरकारने घेतला होता. मात्र आकाशवाणी केंद्र निर्मितीचे काम अद्यापही थंडबस्त्यात आहे. शासनाचेही याकडे दुर्लक्ष आहे.
गडचिरोली-पेंढरी मार्गावर बसफेऱ्या अत्यल्प
धानोरा : गडचिरोली आगारातून पेंढरी मार्गावर बसफेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांकडून केली जात आहे. गडचिरोलीवरून एटापल्ली-अहेरीकडे जाण्यासाठी गडचिरोली-कारवाफा-पेंढरी हा प्रमुख मार्ग आहे.
गरोदर मातांना बुडित मजुरी देण्याची मागणी
सिरोंचा : गरोदर मातांना शासनाकडून बुडित मजुरी दिली जाते. मात्र, जिल्ह्यातील मातांना ही मजुरी देण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. महिला रुग्णालयात चकरा मारत आहेत. ही मजुरी तत्काळ देण्याची मागणी होत आहे. काही महिलांना एक ते दीड वर्षांपासून बुडित मजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला अद्यापही वंचित आहेत.
शहरातील अनेक वॉर्डात सट्टापट्टी जोमात
गडचिरोली : शहरात सट्टापट्टी जोमात सुरू आहे. अनेक युवक सट्टापट्टीच्या नादात लागले आहेत. शहरात शेकडो एजंट सट्टापट्टीची वसुली करत आहेत. मात्र, याकडे गडचिरोली पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. त्यामुळे सट्टापट्टीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक विद्यार्थी व युवक या व्यवसायात गुंतले असल्याचे दिसून येत आहे.
घर बांधकामाचा खर्च दुपटीने वाढला
गडचिरोली : गेल्या दोन वर्षांपासून सळी, सिमेंट, रेती, विटा, गिट्टी व इतर बांधकाम साहित्यांचे भाव प्रचंड वधारले आहेत. याशिवाय मिस्त्री व मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता घर व इमारत बांधकामाचा खर्च दुपटीने वाढला आहे.
पशुयोजनांबाबत जनजागृती करा
भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे.
मूल मार्गावरील बसफेऱ्या वाढवा
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील अनेक नागरिक मूल, चंद्रपूरला ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावरून नेहमीच प्रवाशांची वर्दळ राहते. त्या तुलनेत बसफेऱ्या कमी आहेत. परिणामी नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. आता अनलाॅक झाल्यापासून विवाह साेहळे सुरू झाले आहेत. परिणामी प्रवाशांची संख्या वाढल्याने बसफेऱ्यांची गरज आहे.
अर्धवट पुलावरून खडतर प्रवास
धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. या भागातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ कि.मी. अंतर कापावे लागते.
लघु व्यावसायिक आर्थिक संकटात
चामाेर्शी : शहरात शेकडो लघु व्यावसायिक अनेक वर्षांपासून व्यवसाय करून कुटुंब चालवत आहेत. मात्र, कोरोना संकटामुळे यावर्षी त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कुटुंब कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लघु व्यवसाय करणाऱ्यांची दैनंदिन आवक रोजच्या आर्थिक घडामोडींवर अवलंबून असते. मात्र, कोरोनामुळे सर्व व्यवहार डबघाईस आले आहेत.
परवाना शिबिराचे आयोजन करावे
काेरची : तालुक्यात दिवसेंदिवस वाहनधारकांची संख्या वाढत आहे. मात्र, अनेकांजवळ वाहन चालविण्याचा परवाना नाही. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी ठरावीक दिवशी शिबिर आयोजित केले जाते. मात्र, कोरोनामुळे अशा शिबिराचे आयोजन बंद केले आहे.
जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
आलापल्ली : मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर ही जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
अपंग विवाह अनुदान योजनेची जागृती करा
आष्टी : संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या वतीने अपंग युवक, युवतींसाठी कल्याण विवाह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत अपंग कल्याण विवाह योजना राबविली जाते. मात्र, या योजनेची जनजागृती करण्यात येत नसल्याने, अनेक अपंग युवक, युवती योजनेबाबत अनभिज्ञ आहेत.
औद्योगिक वसाहती स्थापन करा
गडचिरोली : जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी चामोर्शी, आष्टी, आलापल्ली येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी. याठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या उद्योगांना ५० टक्के सुटीवर वीज, पाणी, जागा व इतर सवलती देण्यात याव्या, अशी मागणी आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
खांब गाडणाऱ्यांवर कारवाई करा
गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर, तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी मार्गावर खड्डा खोदतात नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी, अपघात होण्याची शक्यता आहे.
वर्दळीच्या रस्त्यावर वाढले अतिक्रमण
गडचिराेली : शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. कोरोनानंतर प्रशासनाने शिथिलता दिल्याने वाहने रस्त्यावर धावत आहेत. परंतु, रस्त्याच्या कडेला काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.
ग्रामीण भागात विजेचा लपंडाव
देसाईगंज : सध्या ग्रामीण भागातील अनेक गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच देसाईगंज तालुक्यातील अनेक विद्युत तारा लोंबकळल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे थोडी हवा आली तरी विद्युत पुरवठा खंडित होतो. कृषी पंपधारक शेतकरी रब्बी पिकाची तयारी करत आहे. अशावेळी अखंडित वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. याकडे वीज वितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
कोंडवाड्यातील जनावरे असुरक्षित
आरमाेरी : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीने कोंडवाडे बांधले आहे. मात्र, कोंडवाड्याची दुरावस्था झाली आहे. कोंडवाड्यामध्ये चारा व जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोय करणे कठीण झाले आहे.
निराधार प्रकरणांचा निपटारा करावा
चामाेर्शी : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांंची प्रकरणे तातडीने निकाली काढून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. काेराेना संचारबंदीमुळे कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती असल्याने विलंब हाेत आहे.