इल्लुर ग्रामपंचायतीने वृक्ष लागवडीकडे फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 00:07 IST2019-08-21T00:06:24+5:302019-08-21T00:07:42+5:30
वृक्ष लागवड करण्यासाठी आणलेल्या रोपट्यांपैकी बहुतांश रोपट्यांची लागवड ग्रामपंचायतीने केली नाही. त्यामुळे शेकडो रोपटे इल्लुर गावातील समाज मंदिराच्या परिसरात पडून आहेत. यातील काही रोपटे कोमेजली सुध्दा आहेत.

इल्लुर ग्रामपंचायतीने वृक्ष लागवडीकडे फिरविली पाठ
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : वृक्ष लागवड करण्यासाठी आणलेल्या रोपट्यांपैकी बहुतांश रोपट्यांची लागवड ग्रामपंचायतीने केली नाही. त्यामुळे शेकडो रोपटे इल्लुर गावातील समाज मंदिराच्या परिसरात पडून आहेत. यातील काही रोपटे कोमेजली सुध्दा आहेत.
पर्यावरण संतुलनात झाडांचे अनन्य साधारण महत्त्व असल्याने राज्य शासन राज्यातील विविध विभागांना झाडे लावण्याचे उद्दिष्ट देते. यावर्षी राज्य शासनाने ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला सुध्दा वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. आष्टी परिसरातील इल्लुर ग्रामपंचायतीने वृक्ष लागवड करण्यासाठी ३०० रोपटे आणली होती. यातील जवळपास २०० रोपटे लावण्यात आले. उर्वरित १०० रोपटे इल्लुर येथील समाज मंदिरासमोर बेवारस स्थितीत पडून आहेत. ये-जा करणारी जनावरे रोपटे खात असल्याने यातील काही रोपटे करपली आहेत. अगदी समाज मंदिराच्या पायऱ्यांसमोर रोपटे पडून आहेत.
एकीकडे शासन प्रत्येक झाड जगविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे इल्लुर ग्रामपंचायतीचे प्रशासन शासनाच्या उद्देशाला हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे. ही सर्वच रोपटे खरेदी करून आणली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे पैसे वाया गेले आहेत. सदर रक्कम ग्रामपंचायतीचे सचिव, सरपंच व इतर कर्मचाऱ्यांकडून वसूल करावी, अशी मागणी इल्लुर येथील नागरिकांकडून होत आहे. तसेच शासन आदेश धुडकाविणाऱ्या सचिवावरही कारवाईची मागणी आहे.
जनतेच्या पैशाचा अपव्यय
वृक्ष लागवड योजनेंतर्गत प्रत्येक झाड खरेदी करावे लागते. वृक्ष लागवडीसाठी शासन ग्रामपंचायतीला एकही पैसा देत नाही. वृक्ष लागवडीसाठी ग्रामपंचायतीला स्वत:च्या निधीतून खर्च करावा लागतो. नागरिक पदरमोड करून ग्रामपंचायतीकडे कराचा भरणा करतात. नागरिकांचा हा पैसा सरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य यांच्या दुर्लक्षामुळे असा वाया जात आहे. त्यामुळे याची चौकशी करून कारवाईची मागणी आहे.