कढोलीच्या रणरागिणींनी केली अवैध दारू हद्दपार

By Admin | Updated: September 13, 2015 01:25 IST2015-09-13T01:25:10+5:302015-09-13T01:25:10+5:30

कायद्याने जिल्ह्यात दारूबंदी असतानाही कुरखेडा तालुक्यातील कढोली गावात काही महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री केली जात होती.

Illegal liquor exclusion by Kadoli's Ranaragini | कढोलीच्या रणरागिणींनी केली अवैध दारू हद्दपार

कढोलीच्या रणरागिणींनी केली अवैध दारू हद्दपार

महिलाशक्ती एकवटली : ठोक दारू विक्रेत्याने सोडले गाव
वैरागड : कायद्याने जिल्ह्यात दारूबंदी असतानाही कुरखेडा तालुक्यातील कढोली गावात काही महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री केली जात होती. यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. तसेच सामाजिक संतुलन धोक्यात आले. पोलीस विभागाकडून अवैध दारू विक्रीच्या विरोधात कोणतेही ठोस पावले उचलली जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर कढोली गावातील महिलाशक्ती एकवटली. पूर्णनिर्धाराने या महिलांनी ठोकसह किरकोळ दारू विक्रेत्यांना गावातून बाहेर हाकलले. सद्य:स्थितीत कढोली गावात १०० टक्के दारूबंदी असल्याचे दिसून येते.
कढोली येथील किरण चौधरी, महानंद तलमले, चित्रकला लांजेवार, कल्पना कुरूडकर, निर्मला लांजेवार, गिता जनबंधू, कमल गायकवाड, मंदा निंबेकार, विमल निंबेकार, सुनंदा तलमले, मैनाबाई गरमळे, कमल निंबेकार, ताराबाई चौके, मिनाक्षी मेश्राम, मुक्ता चौधरी, वच्छला मानकर, एकादशी जनबंधू, ममता सहारे आदीसह इतर महिलांनी गावात एकत्र येऊन सभा घेतली. या सभेत कढोली गाव पूर्णपणे दारूमुक्त करण्याचा निर्धार एकमताने करण्यात आला. त्यानंतर या महिलांनी गावात अवैध दारूविक्रेत्याच्या घरी धाड टाकून त्याला गावाबाहेर हाकलण्याचे धोरण सुरू केले. महिलांच्या या आक्रमक पवित्र्यांमुळे कढोली गावातील ठोक विक्रेते स्वत:हून गाव सोडून गेले आहेत. गावात कुठेही अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती या महिलांना मिळाली तर हातचे काम तेथेच ठेवून सर्व महिला एकत्र येतात. त्यानंतर संबंधित दारू विक्रेत्याच्या घरी धाड टाकून त्याच्यावर पोलिसांच्या मदतीने कारवाई करतात. यामुळे कुरखेडा तालुक्यातील कढोली गाव पूर्णपणे दारूमुक्त झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: Illegal liquor exclusion by Kadoli's Ranaragini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.