अवैध दारू व्यवसायाला वचक बसणार
By Admin | Updated: April 24, 2017 01:11 IST2017-04-24T01:11:50+5:302017-04-24T01:11:50+5:30
राज्यात पहिल्यांदाच दारूची वाहतूक करणारे वाहन सरकार जमा करण्याची कारवाई गडचिरोली पोलिसांनी केली.

अवैध दारू व्यवसायाला वचक बसणार
पोलिसांचा दावा : वाहतुकीचे वाहन सरकारजमा करण्याची कारवाई
गडचिरोली : राज्यात पहिल्यांदाच दारूची वाहतूक करणारे वाहन सरकार जमा करण्याची कारवाई गडचिरोली पोलिसांनी केली. सदर कारवाईमुळे दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीसाठी वाहनांचा वापर कमी होण्यास मदत होईल व अवैध दारूच्या व्यवसायाला प्रतिबंध बसेल, असा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात १९९२ मध्ये लोक आंदोलन उभे झाल्याने दारूबंदी करण्यात आली होती. मात्र जिल्ह्यात सर्वत्र अवैध दारू विक्रीचा व्यवसायही वाढीला लागला होता. १ एप्रिल २०१५ ला चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी झाल्यानंतर जिल्ह्यात अवैध दारू व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई करण्याला सुरूवात झाली. तसेच मुंबई दारूबंदी कायद्यातही बदल करण्यात आले. त्यामुळे अवैध दारूच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांनी या धंद्याला रामराम ठोकला. त्यानंतरही लहान व मोठ्या गावांमध्ये अवैध दारूचा व्यवसाय सुरूच आहे. दारूची वाहतूक करण्यासाठी आलिशान गाड्यांचा वापर अलिकडे वाढलेला होता. जिल्ह्यातून व इतर राज्यातून जिल्ह्यात अवैध दारूची वाहतूक केली जात आहे. अवैध दारूचा व्यवसाय करणारे लोक संबंधित वाहन सोडून तीच वाहने पुन्हा पुन्हा दारूच्या वाहतुकीसाठी वापरत होते. मात्र पोलीस प्रशासनाने ११ डिसेंबर २०१६ रोजी चंद्रकुमार मनोहर गुंडावार यांचे मालकीचे वाहन सरकारजमा करण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे आता भविष्यात अवैध दारूच्या व्यवसायात गुंतलेल्या पांढरपेशी गुन्हेगार, पपेट गुन्हेगार यांना मोठा आर्थिक फटका बसेल. परिणामी अवैध दारूच्या धंद्याला प्रभाविपणे प्रतिबंध होईल, असा विश्वास पोलीस विभागाने व्यक्त केला आहे. वाहन सरकार जमा करण्याच्या निर्णयाचे समाजाच्या विविध स्तरातून स्वागत होत आहे. मात्र ही कारवाई निरंतर सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
दारूची तस्करी, दारू जप्त, साहित्य जप्त, दारू तस्करी करणाऱ्यावर गुन्हा आदी बाबी नित्याच्या झाल्या होत्या. मात्र दारूची तस्करी करणारे वाहन सरकार जमा करण्याची घटना वाचून आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. यापुढे वन विभागाप्रमाणे लाकडांसोबत जसे वाहने देखील जप्त केली जातात त्याचप्रमाणे दारू सोबत वाहने ही जप्त करण्यात आली तर नक्कीच दारू तस्करीवर फार मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल यात शंका नाही. ही कार्यवाही सर्वच दारू तस्करी करणाऱ्या वाहनांवर होत राहावी, व पुढेही सुरूच राहावी. अन्यथा पोलीस खात्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन नेहमीचाच होऊन बसेल. पोलीस विभागाच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत केले पाहिजे.
- विलास निंबोरकर, सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती