रस्त्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: September 15, 2014 00:08 IST2014-09-15T00:08:36+5:302014-09-15T00:08:36+5:30
आठ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक लहान- मोठे पुले वाहून गेले आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरील गिट्टी उखळली असल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.

रस्त्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष
गडचिरोली : आठ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक लहान- मोठे पुले वाहून गेले आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरील गिट्टी उखळली असल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. आठ दिवसांचा कालावधी लोटूनही प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे या मार्गावरून गावकरी जीव धोक्यात घालून नाल्यातून प्रवास करीत आहेत. सदर पुलांची तत्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मागील १ महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने आठ दिवसांपूर्वी संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाल्यांना पूर आला. या पूरात निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले असलेले पूल तुटले आहेत. दुर्गम भागातील जवळपास असे २० पूल तुटले आहेत. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे व पुरामुळे अनेक मार्ग खरडून गेले आहेत. या मार्गावर मोठ- मोठे खड्डे पडले असल्याने मार्गक्रमण करणे, अशक्य झाले आहे. भामरागड, एटापल्ली, कोरची, सिरोंचा, धानोरा या दुर्गम भागातील नागरिक बऱ्याचवेळा तक्रार करीत नाही. त्यामुळे या ठिकाणच्या समस्या लक्षात येत नाही. पूल तुटल्याने मार्ग खरडून गेल्याने मागील आठ दिवसांपासून या गावांमधील नागरिकांना दुसऱ्या गावी जाणे शक्य होत नाही. काही गावातील विद्यार्थी नाल्याच्या पाण्यातून प्रवास करीत आहेत. एखादे दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर अंदाज चुकून मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्गम भागातील पूल व रस्त्यांची दूरवस्था झाली असल्याने ग्रामसेवक, तलाठी यांनी जाणेच बंद केले आहे. त्यामुळे या गावांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील विद्युत पुरवठा मागील आठ दिवसांपासून बंद आहे. मात्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी गावांपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. एखादी समस्या निर्माण झाल्यानंतर सदर समस्या किमान एक महिना मार्गी न लावण्याची गडचिरोली जिल्ह्याच्या प्रशासनाला सवयच झाली आहे. (नगर प्रतिनिधी)