भंडारेश्वराकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष
By Admin | Updated: April 24, 2017 01:13 IST2017-04-24T01:13:53+5:302017-04-24T01:13:53+5:30
आरमोरी तालुक्यातील वैरागडच्या भंडारेश्वराच्या मंदिरासह मार्र्कं डा व वैरागड येथील ऐतिहासिक वास्तूंकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

भंडारेश्वराकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष
जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार : आमदारांकडून मंदिराची पाहणी
वैरागड : आरमोरी तालुक्यातील वैरागडच्या भंडारेश्वराच्या मंदिरासह मार्र्कं डा व वैरागड येथील ऐतिहासिक वास्तूंकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या सर्व स्थळांच्या विकासाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, अशी माहिती आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी दिली.
वैरागड येथील भंडारेश्वर मंदिराची पाहणी करून त्यांनी येथील अडचणी जाणल्या. मंदिराची किरकोळ दुरूस्ती आणि मंदिराच्या कळसावरून गाभाऱ्यात पावसाळ्यात जे पाणी गळते, त्याची तत्काळ दुरूस्ती करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी भंडारेश्वर देवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. मंदिराच्या सौदर्यीकरणासाठी वारंवार मंदिराच्या टेकडीचे खोदकाम करण्यात येत आहे. जेथे मंदिर उभे आहे, त्या टेकडीचे खोदकाम टाळावे किंवा आवश्यक तांत्रिक बाबी लक्षात घेऊन खोेदकाम करावे आणि टेकडीवर उगविलेले झाडझुडुपे तोडू नये, त्यामुळे टेकडीची झिज होणार नाही, याकडे लक्ष द्यावे, आदी सूचना प्रशासनाकडे केल्या जाईल, असे आ. गजबे म्हणाले. यावेळी डोनू कांबळे, बालाजी पोफळी, महादेव दुमाने, श्रावण नागोसे उपस्थित होते. (वार्ताहर)