शिक्षकांची रिक्त पदे न भरल्यास विद्यार्थ्यांच्या टीसी काढू
By Admin | Updated: July 29, 2016 01:18 IST2016-07-29T01:18:08+5:302016-07-29T01:18:08+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागडअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोठी येथे शिक्षकांची वाणवा आहे.

शिक्षकांची रिक्त पदे न भरल्यास विद्यार्थ्यांच्या टीसी काढू
पालकांचा इशारा : कोठी आश्रमशाळेत तीन शिक्षक सांभाळतात दहा वर्ग
भामरागड : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागडअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोठी येथे शिक्षकांची वाणवा आहे. येथे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत वर्ग आहेत. मात्र मुख्याध्यापक व महिला अधीक्षक वगळता केवळ तीन शिक्षक अध्यापन करीत आहेत. परंतु माध्यमिक विभागाला शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे तत्काळ पदे न भरल्यास १५ आॅगस्टनंतर विद्यार्थ्यांच्या टीसी काढू, असा इशारा पालक व शिक्षण समितीने मुख्याध्यापकांना दिला आहे.
अतिदुर्गम भागात असलेल्या कोठी येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत एकूण पाच शिक्षक आहेत. परंतु या शिक्षकांपैकी एकाकडे प्रभारी मुख्याध्यापक, महिलेकडे अधीक्षकाचा प्रभार देण्यात आला आहे. उर्वरित तीन शिक्षक पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गांना अध्यापन करीत आहेत. परिणामी अनेक वर्ग शिक्षकाविना चालविले जात आहेत.
कोठी येथील आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंत एकूण २३६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र दहा वर्गातील २३६ विद्यार्थ्यांना केवळ पाच शिक्षक आहेत. यातही मुख्याध्यापक व महिला अधीक्षक वजा करता केवळ तीनच शिक्षक दहावीपर्यंत अध्यापन करीत आहेत. सदर शिक्षक प्राथमिक विभागासाठी पात्र आहेत. मात्र शैक्षणिक गुणवत्तेनुसार माध्यमिक विभागाला एकही शिक्षक नाही. शैक्षणिक सत्र सुरू होऊन जवळपास सव्वा महिन्याचा कालावधी उलटला. मात्र या शाळेत अद्यापही शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. शिक्षकाची नियुक्ती न झाल्याने अनेक वर्गाचा अभ्यासक्रम मागे पडण्याची भीती पालकवर्गातून व्यक्त केली जात आहे.
कोठी आश्रमशाळेत दहा वर्गांना पुरेसे शिक्षक नसल्याने जुलै अखेरपर्यंत शिक्षकांची नियुक्ती करावी, तसे न झाल्यास १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करून विद्यार्थ्यांची टीसी काढून त्यांना घरी घेऊन जाऊ, असा इशारा पालक व शालेय शिक्षण समितीने मुख्याध्यापकांना दिला आहे. मात्र लवकरच शिक्षकांची रिक्त पदे भरून समस्या सोडविली जाईल, अशी मनधरणी शिक्षकांकडून केली जात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक, चादर, ब्लँकेट तसेच इयत्ता पहिले ते चवथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश मागील वर्षी शिल्लक राहिलेल्या गणवेशातूनच देण्यात आले आहेत. उर्वरित वर्गासाठी नवीन गणवेश पुरविण्यात आले नाही.
आश्रमशाळेत शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. सदर रिक्तपदे तत्काळ न भरल्यास १५ आॅगस्ट दिन साजरा करून विद्यार्थ्यांच्या टीसी काढू, असा इशारा पालक व शालेय शिक्षण समितीचे सभापती राजेंद्र मडावी, प्रतिष्ठीत नागरिक जगन्नाथ नरोटी यांनी मुख्याध्यापकांना दिला आहे.
कामाठी व स्वयंपाकीचे प्रत्येकी एक पद रिक्त
कोठी आश्रमशाळेत शिक्षकांच्या रिक्तपदांसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचेही रिक्तपदांची महत्त्वाची समस्या आहे. शिक्षकांची रिक्तपदे असल्याने ती पदे तत्काळ भरणे गरजेचे आहे. त्याबरोबरच स्वयंपाकी, कामाठी यांची रिक्त पदे भरावी. आश्रमशाळेत सध्या चार स्वयंपाक्यांपैकी केवळ तीनच कार्यरत आहेत. एक पद रिक्त आहे. तसेच सहा कामाठ्यांपैकी पाच पदे भरण्यात आली आहे. मात्र यापैकी दोन कामाठी गैरहजर आहेत. त्यामुळे अशैक्षणिक कामांवरही विपरित परिणाम होत आहे.
पालकांनी केलेल्या सूचना प्रकल्प अधिकाऱ्यांना कळविल्या आहेत. १ आॅगस्ट किंवा आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रिक्तपदे भरून काढण्यासाठी शिक्षकांना नियुक्त करणार असल्याची ग्वाही प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
- बी. आर. बिसेन, मुख्याध्यापक, शासकीय आश्रमशाळा कोठी