भाजपला सत्ता दिल्यास धानोरा आदर्श ग्राम बनविणार
By Admin | Updated: November 4, 2015 01:57 IST2015-11-04T01:57:03+5:302015-11-04T01:57:03+5:30
धानोरा गावाला आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या हाती एकहाती सत्ता द्या, असे

भाजपला सत्ता दिल्यास धानोरा आदर्श ग्राम बनविणार
धानोरा : धानोरा गावाला आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या हाती एकहाती सत्ता द्या, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
सोमवारी रात्री धानोरा येथे निवडणूक प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. देवराव होळी, गडचिरोली जिल्हा बँकेचे सचिव अनंत साळवे, कैैलास गुंडावार, नंदकिशोर काबरा, गजानन साळवे, प्रकाश गेडाम, प्रकाश अर्जुनवार, साईनाथ साळवे, रमेश भुरसे, बाजार समितीचे मुख्य प्रशासक शशिकांत साळवे, जि. प. सदस्य प्रशांत वाघरे आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले की, धानोरा ग्राम पंचायतमध्ये मागील १५ वर्ष काँग्रेसची सत्ता होती. परंतु जनतेचे प्रश्न सोडविण्यात ते अपयशी ठरले आहे. पाणीपुरवठा, विद्युत समस्या, रस्ते यासाठी निधीची आवश्यकता असते, केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे धानोरा गावातही भाजपचे सरकार द्या, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. निवडणूक काळात जे राजकीय पक्ष पैसे देतील, त्या पैशातून दिवाळी साजरी करा, मात्र मतदान भाजपला करा, असा सल्लाही पालकमंत्र्यांनी दिला. यावेळी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी धानोरात सहा सभा घेतल्या.
भाजपलाही कोरचीच्या विकासाची एक संधी द्या
४पश्चिम महाराष्ट्राचे पालकमंत्री सहा-सहा महिने येत नव्हते. मंत्रालयात बसून गडचिरोलीच्या विकासाबाबत नियोजन केले जात होते. त्यामुळेच जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. मी या जिल्ह्याचा मुलगा आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी मनापासून झटणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. मंगळवारी कोरची येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या जाहीर सभेला आ. क्रिष्णा गजबे, भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, जि. प. सदस्य पद्माकर मानकर, सभापती अवधराम बागमुळ, भाजपा तालुकाध्यक्ष आनंद चौबे, नसरूद्दीन भामानी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी आ. क्रिष्णा गजबे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने १५ वर्षांत काहीच केले नाही. त्यामुळे कोरची परिसर अविकसित राहिला आहे. भाजपला सत्ता दिल्यास या भागाच्या विकासालाही आम्ही चालना देऊ. त्यामुळे आम्हाला एक संधी द्या, असे आवाहन आ. गजबे यांनी केले. आमदार बनल्यापासून आपली कोरचीला ही चवथी भेट आहे. मतदारांनी भाजपावर विश्वास ठेवत एकहाती सत्ता देण्यासाठी सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. सभेचे संचालन प्रा. गजभिये तर आभार प्रभाकर मानकर यांनी मानले. बसस्टँडसमोर झालेल्या या जाहीर सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)