वाढत्या लोकसंख्येवर विचारमंथन
By Admin | Updated: July 12, 2014 23:39 IST2014-07-12T23:39:29+5:302014-07-12T23:39:29+5:30
वाढती लोकसंख्या देशहित व विकासाच्या दृष्टिकोनातून घातक आहे. लोकसंख्यावाढीवर वेळीच मर्यादा घालणे आवश्यक आहे यासह अनेक बाबींवर लोकसंख्या दिनानिमित्य गडचिरोली व वैरागड

वाढत्या लोकसंख्येवर विचारमंथन
गडचिरोली/वैरागड : वाढती लोकसंख्या देशहित व विकासाच्या दृष्टिकोनातून घातक आहे. लोकसंख्यावाढीवर वेळीच मर्यादा घालणे आवश्यक आहे यासह अनेक बाबींवर लोकसंख्या दिनानिमित्य गडचिरोली व वैरागड येथे आयोजित कार्यक्रमात मंथन करण्यात आले.
स्थानिक शिवाजी महाविद्यालयात निरंतर प्रौढ शिक्षण विस्तार विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने लोकसंख्या दिन नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. म्हशाखेत्री होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. विलास खुणे, प्रा. जे. जी. उईके आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. विलास खुणे यांनी लोकसंख्या वाढीच्या परिणामाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उईके यांनी लोकसंख्या मर्यादित करण्यासंदर्भात उपाययोजना सुचविल्या. लोकसंख्या मर्यादित ठेवणे काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे प्रतिपादन डॉ. डी. जी. म्हशाखेत्री यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. भांडारकर यांनी केले. संचालन डॉ. एम. जे. मेश्राम तर आभार प्रा. आर. पी. करोडकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र वैरागड येथे जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला आरमोरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल मडावी, डॉ. एल. टी. खोब्रागडे उपस्थित होते. मागील तीन, चार वर्षापासून जिल्ह्यातील लोकसंख्या चढत्या क्रमाने वाढत असून सद्यस्थितीत लोकसंख्येची टक्केवारी २३.२ टक्के आहे. त्यामुळे सदर टक्केवारी ही गंभीर बाब आहे, असे प्रतिपादन डॉ. सुनिल मडावी यांनी केले. दरम्यान लोकसंख्यादिनानिमित्य पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. अनेक जनजागृती कार्यक्रम केले जाणार आहेत. यावेळी शासकीय दवाखान्याच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. पंधरवड्यात घोषवाक्य प्रचलित करणे, कुटुंब आरोग्य मेळावे, जन्म दर १.८ टक्के स्थिर ठेवण्यासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. कार्यक्रमाला अंगणवाडी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.