आदर्श ग्रामसभेला मिळणार पुरस्कार
By Admin | Updated: September 27, 2014 23:18 IST2014-09-27T23:18:20+5:302014-09-27T23:18:20+5:30
ग्रामसभांमध्ये नागरिकांची उपस्थिती वाढावी त्याचबरोबर ग्रामसभा कार्यक्षम पद्धतीने काम कराव्या यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने यावर्षी प्रथमच आदर्श ग्रामसभा पुरस्कार देऊन

आदर्श ग्रामसभेला मिळणार पुरस्कार
गडचिरोली : ग्रामसभांमध्ये नागरिकांची उपस्थिती वाढावी त्याचबरोबर ग्रामसभा कार्यक्षम पद्धतीने काम कराव्या यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने यावर्षी प्रथमच आदर्श ग्रामसभा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
केंद्र व राज्य शासनाचा निधी सरळ ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये जमा होते. सदर पैशाचे नियोजन करण्याची व गावाचा विकास करण्याची फार मोठी जबाबदारी ग्रामसभेवर आहे. मात्र बहुतांश नागरिक ग्रामसभांना उपस्थित राहत नाही. त्यामुळे योग्य निर्णय घेतले जात नाही. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांचा ग्रामसभेतील सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने यावर्षीपासून प्रथमच आदर्श ग्रामसभा स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत घेण्यात आलेल्या ग्रामसभेसाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची यासाठी निवड केली जाणार आहे. पुरस्कारासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर समिती गठित करण्यात येणार आहे. ही समिती तालुक्यातील एका ग्रामसभेची निवड करून सदर प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर करेल. जिल्हा स्तरीय समिती पाहणी करून जिल्ह्यातील तीन उत्कृष्ट ग्रामसभांचे प्रस्ताव आदर्श ग्रामसभा पुरस्कारासाठी राज्यस्तरीय समितीकडे सादर करणार आहे. जिल्हास्तरीय समितीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, कार्यकारी अभियंता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश राहणार आहे.
आदर्श ग्रामसभेची निवड करताना ग्रामसभेची उपस्थिती, ग्रामसभेपूर्वी करण्यात येणारी प्रसिद्धी, ग्रामसभेपूर्वी वॉर्डाची सभा, महिला ग्रामसभा, ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती आदी बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत. आदर्श ग्रामसभा म्हणून निवड झाल्यास सदर ग्रामपंचायतीला एक लाख रूपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. आदर्श ग्रामसभा पुरस्कारामुळे नागरिकांची ग्रामसभेतील उपस्थिती वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)