गोनांचे विचार सर्व समाजासाठी कायम दिशादर्शक
By Admin | Updated: January 12, 2015 22:49 IST2015-01-12T22:49:36+5:302015-01-12T22:49:36+5:30
दंडकारण्य शिक्षण व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेची मुहूर्तमेढ रोवून गोविंदराव मुनघाटे यांनी हलाखीच्या परिस्थितीत येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले.

गोनांचे विचार सर्व समाजासाठी कायम दिशादर्शक
गडचिरोली : दंडकारण्य शिक्षण व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेची मुहूर्तमेढ रोवून गोविंदराव मुनघाटे यांनी हलाखीच्या परिस्थितीत येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांनी आपल्या जीवनात नेहमी सेवेचा सकारात्मक दृष्टीकोण ठेवला. गो. ना. मुनघाटे यांचे कार्य व विचार सर्व समाजाला कायम दिशादर्शक राहतील, असे प्रतिपादन माजी खासदार मारोतराव कोवासे यांनी केले.
दंडकारण्य शैक्षणिक संस्थेच्यावतीने येथील विद्याभारती कन्या हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कमल-गोविंद स्मृती प्रतिष्ठान उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, सुधीर भातकुलकर, माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, दंडकारण्य शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. डॉ. प्रमोद मुुनघाटे, दंडकारण्य संस्थेचे कोषाध्यक्ष माजी प्राचार्य भैय्यासाहेब ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम स्व. कमलताई व गोविंदराव मुनघाटे यांच्या प्रतिमा पुजनाने मान्यवरांच्या हस्ते कमल-गोविंद स्मृती प्रतिष्ठानचे उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना खा. कोवासे म्हणाले. गोविंदराव मुनघाटे यांच्याशी माझा १९८० पासून संबंध आला. आयुष्यात त्यांच्याकडून आपल्याला सामाजिक दृष्ट्या नेहमी मोलाचे मार्गदर्शन लाभले. पराभवाच्या काळातही त्यांनी मला धीर दिला. साहित्यीक, उत्कृष्ट शिक्षक, संस्थाचालक, समाजसेवक म्हणून त्यांचे कार्य कायम स्मरणात राहिल, असेही कोवासे म्हणाले.
याप्रसंगी माजी आमदार डॉ. उसेंडी व अरविंद पोरेड्डीवार यांनी गोविंदराव मुनघाटे यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व साहित्यिक कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी आयोजक समितीच्यावतीने स्लाईड प्रोजेक्टद्वारे गोविंदराव मुनघाटे यांच्या जीवनकार्यावरील चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाला दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, संस्थेचे सदस्य पांडुरंग म्हशाखेत्री, एन. के. बानबले, भा. ना. मुनघाटे, सुरेश लडके, प्राचार्य के. वाय. वाघरे, अरूण मुनघाटे, प्रकाश पोरेड्डीवार, प्राचार्य संजय भांडारकर, प्राचार्य सागर म्हशाखेत्री, प्राचार्य विद्या आसमवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले. तर संचालन व आभार प्रा. नरेंद्र आरेकर यांनी मानले. कार्यक्रमानंतर गीतांचा कार्यक्रम झाला. (स्थानिक प्रतिनिधी)