परिश्रम व जिद्दीच्या बळावर आयएएस, आयपीएस व्हा

By Admin | Updated: September 3, 2015 00:54 IST2015-09-03T00:54:29+5:302015-09-03T00:54:29+5:30

आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहलीतील सहभागी विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन परिश्रम व जिद्दीच्या बळावर भविष्यात आयएएस व आयपीएस दर्जाचे अधिकारी बनावेत,

IAS, IPS, on the strength of diligence and stubbornness | परिश्रम व जिद्दीच्या बळावर आयएएस, आयपीएस व्हा

परिश्रम व जिद्दीच्या बळावर आयएएस, आयपीएस व्हा

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : महाराष्ट्र दर्शन सहलीचा समारोप
गडचिरोली : आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहलीतील सहभागी विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन परिश्रम व जिद्दीच्या बळावर भविष्यात आयएएस व आयपीएस दर्जाचे अधिकारी बनावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले. महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहलीच्या दहावी फेरीचा बुधवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) गणेश बिरादार उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी रणजीतकुमार म्हणाले, सहलीतील विद्यार्थ्यांना आरोग्य, शिक्षण तसेच इतर बाबतीत कोणत्याही समस्या निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय विभागास मदत मागावी, स्थानिक प्रशासकीय विभागाने कोणताही प्रतिसाद न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालय अथवा पोलीस अधीक्षक कार्यालयात निसंकोचपणे मदत मागावी, दोन्ही कार्यालयाच्या वतीने अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा दिलासाही जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी यावेळी दिला.
आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहलीच्या दहावी फेरीमध्ये मुल-मुली मिळून ८१ विद्यार्थी सहभागी झाले होते. बुधवारी सहलीवरून सदर विद्यार्थी गडचिरोलीत पोहोचले. या सहलीमध्ये पाच नक्षल पीडित कुटुंबांचे सदस्य व पाच नक्षल सदस्यांचे नातेवाईकही सहभागी होते. तर उर्वरित विद्यार्थीही जिल्ह्यातील दुर्गम भागातील होते. याप्रसंगी सहलीतील विद्यार्थी कमलू उसेंडी मनोगत व्यक्त करताना म्हणाला, आपण प्रथमच गडचिरोली जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण तसेच उर्वरित महाराष्ट्र पाहिला. पहिल्यांदाच रेल्वे, मेट्रो रेल्वे, समुद्र, गेटवे आॅफ इंडिया आदी पाहून प्रचंड आनंदीत झालो.
गायत्री उईके हिने सांगितले की, गडचिरोली आणि बाहेरील इतर जिल्ह्यात खूपच फरक आहे. आपल्याला मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरात शिकून आयपीएस व्हायचे आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात प्रगती झाली आहे, तशीच प्रगती शालेय शिक्षण घेऊन गडचिरोली जिल्ह्यात करण्याचा मानस गायत्री उईकेने यावेळी व्यक्त केला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, पोलीस विभाग गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील मुला-मुलींसाठी विविध योजना राबवित आहे. याचा सकारात्मक परिणाम होत असून जिल्ह्याच्या दुर्गम भागातील मुलांच्या विचारसरणीमध्ये चांगला बदल दिसून येत आहे. संचालन जनसंपर्क अधिकारी तेजस्वी पाटील यांनी तर आभार पोलीस उपनिरीक्षक पालवे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: IAS, IPS, on the strength of diligence and stubbornness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.