मी व माझे घर ही भारताची संस्कृती नाही
By Admin | Updated: September 13, 2015 01:22 IST2015-09-13T01:22:53+5:302015-09-13T01:22:53+5:30
केवळ मी व माझे घर यांचा विचार करणे ही भारताची संस्कृती नाही. आपला देश धर्म, समाज यांचा विचार केला पाहिजे.

मी व माझे घर ही भारताची संस्कृती नाही
अरूण नेटके यांचे प्रतिपादन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे गडचिरोलीत युवा संमेलन
गडचिरोली : केवळ मी व माझे घर यांचा विचार करणे ही भारताची संस्कृती नाही. आपला देश धर्म, समाज यांचा विचार केला पाहिजे. समाज व देशासाठी काही देण लागते हे विचार आणले पाहिजे. तरूण पिडीतून कार्यकर्ते निर्माण होतील. हा स्वामी विवेकानंदांचा विश्वास होता. तरूणांमध्ये राष्ट्रप्रेम जागरूक करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. हिंदू धर्म व संस्कृतीचा आदर करून देश हिताच्या कार्यासाठी तरूणांनी पुढे आले पाहिजे, असे विश्व हिंदू परिषदेचे प्रांत संघटन मंत्री अरूण नेटके यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गडचिरोली शाखेच्या वतीने दिग्विजय दिनानिमित्त शुक्रवारी गडचिरोली येथे आयोजित युवक संमेलनात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर संघचालक उकंडराव राऊत, सतीश चिचघरे आदी मान्यवर उपस्थित होते.
अरूण नेटके पुढे म्हणाले की, मनाचा निश्चय महत्त्वाचा ठरत असून स्वामी विवेकानंदांचा आदर्श जोपासत युवकांनी आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. व्यक्तिमत्त्वाचा विकास करून राष्ट्रहित जोपासण्याची गरज आहे. व्यक्तिमत्त्व व भाषण शैली हे दोन महत्त्वाचे कौशल्य असून त्यावर तरूणांनी प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी ब्रह्मचर्य, एकाग्रता व नित्यनियमाची गरज आहे. विचारांचे सामर्थ्य आचरणात असते. त्यामुळे तरूणांनी चांगला विचार कृतीतून आचरणात आणला पाहिजे. हिंदू धर्म जगात श्रेष्ठ असून या देशाची संस्कृती महान आहे. त्यामुळे हिंदू धर्म व संस्कृतीबद्दल सर्वांनी गर्व व आदर बाळगला पाहिजे.
भारत हा स्वाभिमान बाळगणाऱ्यांचा देश आहे. त्यामुळे तरूणांनी रोजगारासाठी भटकंती करू नये. देशभक्त बणून युवकांनी भारतमातेचे कर्ज फेडले पाहिजे. तरूणांनी उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करून स्वत:चे सामर्थ्य वाढवावे, असे प्रतिपादन केले. संचालन संतोष बोलुवार यांनी केले. कार्यक्रमाला संघाचे स्वयंसेवक उपस्थित होते.