भामरागडात पक्षांकडून उमेदवारांची शोधाशोध

By Admin | Updated: February 3, 2017 01:18 IST2017-02-03T01:18:07+5:302017-02-03T01:18:07+5:30

भामरागड येथे नगर पंचायतीची स्थापना झाल्याने अनेक उमेदवारांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढता येणार नाही.

Hunt for candidates from Bhamragarad | भामरागडात पक्षांकडून उमेदवारांची शोधाशोध

भामरागडात पक्षांकडून उमेदवारांची शोधाशोध

दोन जिल्हा परिषद क्षेत्र : नगर पंचायतीने अडचण वाढली
रमेश मारगोनवार   भामरागड
भामरागड येथे नगर पंचायतीची स्थापना झाल्याने अनेक उमेदवारांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढता येणार नाही. त्यामुळे ग्रामीण भागातीलच उमेदवार शोधावा लागत आहे. उमेदवार शोधताना राजकीय पक्षांना बरीच तारेवरची कसरत करावी लागत आहे.

भामरागड तालुक्यात दोन जिल्हा परिषद क्षेत्र व चार पंचायत समिती गण आहेत. नेलगुंडा-आरेवाडा क्षेत्र अनुसूचित जमाती पुरूष तर मन्नेराजाराम-कोठी जिल्हा परिषद क्षेत्र अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव आहे. नेलगुंडा पंचायत समिती गण सर्वसाधरण उमेदवार, आरेवाडा पंचायत समिती गण अनुसूचित जमाती महिला, कोठी पंचायत समिती गण अनुसूचित जमाती महिला व मन्नेराजाराम पं. स. गण अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. भामरागड तालुक्यातील बहुतांश गावे नक्षलग्रस्त व विकासाच्या बाबतीत मागासले आहेत. बहुतांश गावे जंगलांनी वेढले आहेत. अनेक गावांना जाण्यासाठी रस्ते नाहीत. नक्षल्यांच्या भीतीने दुर्गम भागातील नागरिक जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढण्यासाठी तयार होत नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भामरागड येथीलच उमेदवार उभे राहत होते. मात्र मागिल वर्षी भामरागड येथे नगर पंचायतीची स्थापना झाली. त्यामुळे भामरागड शहरातील उमेदवारांना जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढण्यास निवडणूक विभागाने प्रतिबंध घातला आहे. परिणामी राजकीय पक्षांना भामरागड वगळता इतर गावांमधून उमेदवार शोधावा लागत आहे.
दुर्गम भागातील बहुतांश नागरिकांकडे दाखले राहत नाही. प्रत्येक राखीव क्षेत्रासाठी निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. बहुतांश नागरिकांकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही. त्यामुळे निवडणूक लढण्याची इच्छा असून सुद्धा ते निवडणूक लढू शकत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांची उमेदवारांची शोधाशोध करताना बरीच कसरत करावी लागत आहे. निवडणुकीचे अर्ज भरण्यास १ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असली तरी राजकीय पक्षांनी अजूनपर्यंत उमेदवारी जाहीर केली नाही.
भामरागड तालुक्यात प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी या तिनच प्रमुख पक्षांचे वर्चस्व आहे. काही दिग्गज उमेदवारही अपक्ष निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेलगुंडा-आरेवाडा क्षेत्रात काँग्रेसने उमेदवार उभा केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार राहणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे. भाजपा व इतर पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याने त्यांचे उमेदवार सर्वच जागांवर उभे राहतील. मात्र कुणाला कुठे उमेदवारी द्यायची हे अजूनपर्यंत एकाही राजकीय पक्षाने जाहीर केले नाही. त्यामुळे उमेदवारांची घालमेल वाढली आहे.

नवख्यांना मिळणार संधी
भामरागड येथे नगर पंचायत झाल्याने पारंपरिक उमेदवारांचा पत्ता कट झाला आहे. महिलेसाठी जागा आरक्षित झाल्यास भामरागड येथील राजकारणी स्वत:च्या पत्नीला किंवा नातेवाईकाला उमेदवारी मागत होते. त्यामुळे भामरागड तालुक्यात घराणेशाही निर्माण झाली होती. दुर्गम व ग्रामीण भागातीलही उमेदवार उमेदवारी मागत होते. मात्र त्यांना उमेदवारी दिली जात नव्हती. मात्र आता नगर पंचायतीमुळे हा सर्व प्रकार बंद झाला आहे. परिणामी यावर्षी नवख्या व स्थानिक उमेदवारांना निवडणूक लढण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Web Title: Hunt for candidates from Bhamragarad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.