शतकोटी वृक्ष लागवडीचे आॅडिट रखडले

By Admin | Updated: October 14, 2014 23:18 IST2014-10-14T23:18:50+5:302014-10-14T23:18:50+5:30

शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लावण्यात आलेल्या वृक्षांची तपासणी मोहीम एक महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती. मात्र त्यानंतर विधानसभेची आचारसंहिता सुरू झाल्याने संपूर्ण प्रशासन निवडणुकीच्या

Hundreds of trees were planted | शतकोटी वृक्ष लागवडीचे आॅडिट रखडले

शतकोटी वृक्ष लागवडीचे आॅडिट रखडले

देसाईगंज : शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लावण्यात आलेल्या वृक्षांची तपासणी मोहीम एक महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती. मात्र त्यानंतर विधानसभेची आचारसंहिता सुरू झाल्याने संपूर्ण प्रशासन निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त झाले आहे. त्यामुळे शतकोटी वृक्ष लागवडीच्या आॅडिटचे काम रखडले आहे. सदर कामाला आता दिवाळीनंतरच गती येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
संपूर्ण राज्यात १०० कोटी वृक्षांची लागवड करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ या तीन वर्षात शतकोटी वृक्षलागवड योजनेची अंमलबजावणी केली. या योजनेंतर्गत ग्रामपंचायतीसह जिल्हा परिषद, महसूल विभाग, वन विभागाला एका विशिष्ट प्रमाणात वृक्षांची लागवड करणे सक्तीचे करण्यात आले आहे. यासाठी लागणारा सर्व खर्च राज्य शासनाकडून संबंधित विभागाला उपलब्ध करून देण्यात आला. त्याचबरोबर वृक्ष लागवडीची सक्तीही करण्यात आली. आपल्यावर कारवाई होऊ नये यासाठी प्रत्येकच विभागाने उद्दीष्टाएवढे किंवा त्यापेक्षाही जास्त प्रमाणात वृक्षांची लागवड केली, असे कागदोपत्री दाखविले. मात्र प्रत्यक्षात फारच कमी प्रमाणात वृक्ष जिवंत असल्याचे लक्षात आल्यानंतर शासनाने शिक्षकांच्या माध्यमातून वृक्ष लागवडीची तपासणी मोहीम सुरू केली. ज्या शाळांंमध्ये हरितसेना पथक कार्यरत आहे. या पथकाकडून वृक्ष पाहणीचे काम सुरू करण्यात आले होते. शालेय वेळ वगळून हे काम शिक्षकांना करायचे होते. यामध्ये वृक्ष लागवडीची संख्या, वृक्षांची परिस्थिती, झाडांची उंची, झाडाला लावण्यात आलेले कुंपन, लागवड केलेल्या वृक्षांच्या प्रजाती व गावकऱ्यांनी प्रतिक्रिया तपासली जाणार आहे.
वृक्ष तपासणी मोहिमेला सुरूवात झाल्यानंतर अगदी आठ दिवसांतच विधानसभेचे आचारसंहिता सुरू झाली. त्यामुळे निवडणुकीच्या कामामध्ये महसूल प्रशासनासह, शिक्षण, वनीकरण, वन विभागाचे कर्मचारी व्यस्त झाले. त्यामुळे तपासणीचे काम थंडावले असल्याचे दिसून येत आहे. आठ दिवसानंतर दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत. त्यामुळे वृक्ष तपासणीचे काम दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतरच सुरू होईल, अशी शक्यता अधिकारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. मोहीम रखडल्याने राज्यात नेमकी किती झाडे जिवंत आहेत. याचा अधिकृत आकडा प्रशासनाला प्राप्त झाला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Hundreds of trees were planted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.