शेकडो हेक्टरवरील धानाला पुराचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST2020-08-25T05:00:00+5:302020-08-25T05:00:56+5:30
भामरागड तालुक्यासह छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा, इंद्रावती व पामुलगौतम या तिन्ही नद्यांना पूर आला होता. भामरागड तालुक्यात सिंचनाची सुविधा नसल्याने प्रामुख्याने नदी काठी किंवा नाल्याजवळ सखल भागात धानाची शेती केली जाते. पुराचे पाणी या शेतीमध्ये शिरते. यावर्षीच्या पावसाळ्यात तब्बल सहा दिवस पूर परिस्थिती कायम होती. सहा दिवस धानाच्या बांध्यांमध्ये पाणी शिरले असल्याने पीक बुडून होते.

शेकडो हेक्टरवरील धानाला पुराचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड तालुक्यात तब्बल सहा दिवस पाऊस आणि पुराच्या पाण्याने थैमान घातले. पुराचे पाणी धानपिकात शिरल्याने धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.
भामरागड तालुक्यासह छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा, इंद्रावती व पामुलगौतम या तिन्ही नद्यांना पूर आला होता. भामरागड तालुक्यात सिंचनाची सुविधा नसल्याने प्रामुख्याने नदी काठी किंवा नाल्याजवळ सखल भागात धानाची शेती केली जाते. पुराचे पाणी या शेतीमध्ये शिरते. यावर्षीच्या पावसाळ्यात तब्बल सहा दिवस पूर परिस्थिती कायम होती. सहा दिवस धानाच्या बांध्यांमध्ये पाणी शिरले असल्याने पीक बुडून होते. त्यामुळे ते आता करपल्यासारखे झाले आहे. तसेच पुराच्या पाण्याची गाळ धान पिकावर साचली आहे. आता पावसाने उसंत घेतल्याने पानांवर साचलेले गाळ कायम राहणार आहे. याचा मोठा फटका धानपिकाला बसण्याची शक्यता आहे. कधीकधी पाण्याअभावी धानपीक करपते. तर कधी पुरामुळे फटका बसते.
नुकसानीचे पंचनामे होणार
सहा दिवस असलेल्या पुरामुळे शेती व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही पाळीव प्राण्यांनाही जीव गमवावा लागला आहे. अजूनपर्यंत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत. मात्र महसूल विभागामार्फत नुकसानीचा पंचनामा केला जाईल. त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला जाईल. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती भामरागडचे तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी दिली.