शेकडो हातपंप बंद
By Admin | Updated: April 21, 2017 01:11 IST2017-04-21T01:11:56+5:302017-04-21T01:11:56+5:30
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात हातपंप नादुरूस्त स्थितीत आहेत.

शेकडो हातपंप बंद
दुर्लक्ष : ग्रामीण भागात नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव
गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात हातपंप नादुरूस्त स्थितीत आहेत. काही ठिकाणी सौरऊर्जेवरील पाणीपुरवठा योजना बंद पडून आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. नदीकाठावरील गावांनाही पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे.
मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली माल ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या मलकापूर येथे मागील आठवडाभरापासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. गावातील दोन हातपंपातील जलपातळी खालावली असून येथील सौरऊर्जेवरील नळयोजनाही बंद अवस्थेत आहे.
अडपल्ली गट ग्रामपंचायत अंतर्गत सहा गावांचा समावेश होतो. या गावांपैैकी मलकापूर गाव आहे. या गावाची लोकसंख्या अडीच हजारावर आहे. लोकसंख्येच्या मानाने येथे केवळ दोन हातपंप आहेत. तसेच २००८ मध्ये जलस्वराज्य योजनेतून ६८ हजार रूपयांचा खर्च करून सौरऊर्जेवरील नळ योजना कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेंतर्गत गावात पाण्याची टाकी व पाईपही टाकण्यात आले. काही दिवस सुरळीत पाणी पुरवठा झाला. मात्र काही दिवसांतच नळ योजना बंद पडली. अडीच हजारावर लोकसंख्या असतानाही गावात केवळ दोन हातपंप आहेत. सध्या या हातपंपातील जलस्तर घटलेला आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पहाटेपासूनच नळावर गर्दी करावी लागते. सौर ऊर्जेवरील नळ योजनेंतर्गत ८०० लोकांना कनेक्शन देण्यात आले आहे. अहेरी तालुक्यातील तिमरम येथील दोन्ही हातपंप मागील सात दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे या गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
तिमरम या गावाची लोकसंख्या जवळपास २०० एवढी आहे. या गावात केवळ दोनच हातपंप आहेत. दोन्ही हातपंप एकाचवेळी बंद पडल्याने गावातील महिलांना अर्धा किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. पुरूष मंडळीही पाणी भरत असल्याचे दिसून येत आहे. १० दिवसांपूर्वी बंद अवस्थेतील हातपंप दुरूस्त करण्यात आला. मात्र सदर हातपंप केवळ दोन दिवसातच बंद पडला.
चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरातील पेटतळा येथील वार्ड क्रमांक २ मधील तीन हातपंप मागील एक महिन्यापासून बंद आहेत. यामध्ये तुळसाबाई येर्रेवार यांच्या दुकानासमोरील, गजनान बर्लावार यांच्या घरासमोरील व गोटूल जवळील हातपंपाचा समावेश आहे. गडचिरोली शहरानजीक असलेल्या नवेगाव व मुरखळा या दोन गावांमधील जवळपास सहा हातपंप बंद असल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील तीन हातपंप गेल्या दहा दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. धानोरा तालुक्यातील नरचुली ग्राम पंचायतीतर्गत येत असलेल्या वानरचुवा येथे बांधकाम करण्यात आलेल्या विहिरीला प्लेटफार्म नसल्याने सदर विहिरीवरून पाणी भरता येत नाही. गावात एकच हातपंप असल्यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.
अनेक ठिकाणी पंचायत समित्यांकडे नागरिकांनी हातपंप बंद असल्याबाबत तक्रारी केल्या. परंतु पंचायत समितीस्तरावर एक किंवा दोनच पथक कार्यरत आहे. बंद हातपंपाची संख्या अधिक असल्याने पथकाचीही हातपंप दुरूस्तीसाठी दमछाक होत आहे. वाढत्या उष्णतामानात दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत गावेही ओस पडून आहेत. त्यामुळे पथकही आपले काम करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. (लोकमत वृत्तसेवा)