कुरखेडा एसडीओ कार्यालयावर धडकले शेकडो शेतकरी
By Admin | Updated: December 6, 2015 01:16 IST2015-12-06T01:16:32+5:302015-12-06T01:16:32+5:30
यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यंत कमी पाऊस पडल्याने कुरखेडा व कोरची या तालुक्यातील बहुतांश धानपीक करपले आहे.

कुरखेडा एसडीओ कार्यालयावर धडकले शेकडो शेतकरी
दुष्काळ घोषित करा : आदिवासी विद्यार्थी संघाचा पुढाकार
कुरखेडा : यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यंत कमी पाऊस पडल्याने कुरखेडा व कोरची या तालुक्यातील बहुतांश धानपीक करपले आहे. त्यामुळे शासनाने हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त घोषीत करून विविध योजनांचा लाभ द्यावा या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या नेतृत्वात कुरखेडा उपविभागीय कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढण्यात आला.
कुरखेडा, कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी २५ हजार रूपये मदत जाहीर करावी, महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करावी, कुरखेडा व कोरची तालुक्यातील लोडशेडिीग बंद करून घरगुती वीज बिल पूर्ववत तीन महिन्यांचे द्यावे, तलाव व बोड्यांचे खोलीकरण करावे, तसेच दुरूस्ती करावी, बीपीएल यादीचा पुनर्सर्वे करावे करावा, अतिक्रमणाचे पट्टे व सामुहिक वनहक्क दावे मंजूर करावे, पेसा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, प्रत्येक शेतकऱ्याला बोअरवेल व विहीर खोदून द्यावी, सौरउर्जेवरील मोटारपंप लावून द्यावे, बँकांनी दिलेले कर्ज माफ करावे, धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये समविष्ट करू नये, २०१०-११ मध्ये सडलेल्या धानाची संस्थांकडून वसुली करू नये, प्रत्येक मार्गाचे डांबरीकरण करून उखडलेले रस्ते दुरूस्त करावे आदी मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात कुरखेडा व कोरची तालुक्यातील शेकडो शेतकरी, शेतमजूर, कामगार सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व आदिवासी विद्यार्थी संघाचे सरसेनापती नंदू नरोटे, जिल्हाध्यक्ष प्रविण मडावी यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)