Humans are responsible for the magnitude of natural disasters | नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढण्यास मानवच जबाबदार
नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढण्यास मानवच जबाबदार

ठळक मुद्देवादविवादातील स्पर्धकांचा सूर : राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवात रंगली स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देशासह जगात येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे मानवाची मोठी हानी होते. भौगोलिक परिस्थिती व वातावरणात बदल होत असल्याने नैसर्गिक आपत्तीला मानवाला सामोरे जावे लागत आहे. मात्र काही वेळा नैसर्गिक आपत्ती मानवनिर्मित असतात, किंबहुना नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढविण्यासाठी मानवच जबाबदार आहे, असा युक्तीवाद अनेक स्पर्धक विद्यार्थ्यांनंी केला. नैसर्गिक आपत्ती टाळता येत नाही, मात्र त्यापासून माणसाचा बचाव करता येतो, हाणी रोखता येते, आणि त्यासाठी योग्य व्यवस्थापन हवे, असाही सूर बहुतांश स्पर्धकांनी यावेळी काढला.
स्थानिक गोंडवाना विद्यापीठात १७ वा आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव इंद्रधनुष्य २०१९ च्या चौथ्या दिवशी येथे वादविवाद स्पर्धा पार पडली. ‘नैसर्गिक आपत्ती मानवनिर्मित असतात’ असा स्पर्धेचा विषय होता. या स्पर्धेत एकूण १४ विद्यापीठांच्या २८ स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपली वक्तृत्वकला व समयसूचकता दाखविली. प्रत्येक विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने विषयाच्या बाजुने तर दुसऱ्या विद्यार्थ्याने विषयाच्या विरूध्द बाजुने आपले मत आत्मविश्वासपूर्ण मांडले. सदर स्पर्धेत गडचिरोलीचे यजमान गोंडवाना विद्यापीठासह, मुंबई विद्यापीठ, रामटेक, राहुरी, परभणी, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव, शाहू महाराज विद्यापीठ कोल्हापूर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक, सोलापूर, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर आदी विद्यापीठांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सहा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेसाठी नोंदणी केली नाही.
स्पर्धकांनी आपापल्या पध्दतीने सदर विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक आपत्ती ही आधीपासूनच येत आहे. सध्याच्या विज्ञान युगात आता नैसर्गिक आपत्ती येत असून त्याची तिव्रता व वेग वाढला आहे. यापूर्वी नैसर्गिक आपत्तीची तिव्रता कमी प्रमाणात होती. एकूणच नैसर्गिक आपत्ती ही आपण टाळू शकत नाही. मात्र तिची तिव्रता कमी करता येते. नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करता येतो. मात्र यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या व्यवस्थापनात मानवाचा हलगर्जीपणा येऊ नये, अन्यथा विविध नैसर्गिक आपतीपासून मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते, असा सार या वादविवाद स्पर्धेतून व्यक्त करण्यात आला. सदर स्पर्धेचे परिक्षक म्हणून डॉ.अरुण पाटील, डॉ.मंजिरी वैद्य, डॉ.चंद्रशेखर मलकामपट्टे आदींनी काम पाहिले. संचालन प्रा.अविनाश भुरसे यांनी तर समन्वयक म्हणून प्रा.अमोल घोडे यांनी काम पाहिले.

मानवाच्या हस्तक्षेपामुळे नैसर्गिक आपत्ती?
भूकंप, पूर, महापूर, त्सुनामी, वनवा, ज्वालामुखी, चक्रीवादळ आदीसह इतर नैसर्गिक आपत्ती गेल्या अनेक वर्षांपासून पृथ्वीतलावर येत आहे. पंचतत्वापासून पृथ्वी तयार झाली आहे. जलावरण, वातारण, शीलावरण, पर्यावरण आदी निसर्गातील घटक आहे. मानवाच्या अस्तित्वापूर्वी भूतलावर डायनासोरचे अस्तित्व होते. त्यावेळीही जगात विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आल्या होत्या, असे मत काही स्पर्धक विद्यार्थ्यांनी मांडले. एकूणच नैसर्गिक आपत्ती हे निसर्गात विविध प्रकारचे बदल झाल्याने घडून येत आहेत. यात मानवाचा हस्तक्षेप नाही, असे दुसऱ्या बाजुच्या स्पर्धकांनी सांगितले. तर विषयाच्या बाजुने बोलणाऱ्या स्पर्धकांनी पूर्वीच्या तुलनेत आता महापूर, चक्रीवादळ, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. याला मानवाचा हस्तक्षेप जबाबदार आहे, असे मत व्यक्त केले.

श्रेयश तळपदेच्या हस्ते आज बक्षीस वितरण
गेल्या २ डिसेंबरपासून गोंडवाना विद्यापीठात सुरू असलेल्या राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सवाचा समारोप शुक्रवारी सकाळी १० वाजता सिनेअभिनेता श्रेयश तळपदे याच्या हस्ते बक्षीस वितरणाने होणार आहे.

Web Title: Humans are responsible for the magnitude of natural disasters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.