मानवाधिकार आयोगाकडून दखल
By Admin | Updated: January 21, 2016 00:18 IST2016-01-21T00:18:38+5:302016-01-21T00:18:38+5:30
२३ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास आलापल्लीवरून स्वगावी गट्टेपल्लीकडे दुचाकीने जात असताना चंद्रा व गट्टेपल्लीच्या ...

मानवाधिकार आयोगाकडून दखल
बिरसू आत्राम मारहाण प्रकरण : १ फेब्रुवारीला धरणे आंदोलन
गडचिरोली : २३ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास आलापल्लीवरून स्वगावी गट्टेपल्लीकडे दुचाकीने जात असताना चंद्रा व गट्टेपल्लीच्या गावाच्या दरम्यान सीआरपीएफ जवानांनी रस्त्यात थांबायला लावून विनाकारण बिरसू आत्राम या तरूणाला मारहाण केली होती. याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल त्यांनी घेतली असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष आत्राम व पीडित युवक बिरसू आत्राम यांनी बुधवारी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी माहिती देताना बिरसू आत्राम म्हणाला, सिक्युलर युवर लाईफ या खासगी कंपनीच्या सेमिनारसाठी मी २० सप्टेंबर २०१५ ला आलापल्लीला आलो होतो. सेमिनार आटोपल्यानंतर एमएच-३३-के-८०६४ क्रमांकाच्या दुचाकीने माझा मित्र मिथून मडावी याला चंद्रा या गावी सोडलो. त्यानंतर गट्टेपल्लीकडे निघालो. दीड किमी अंतरावर पोहोचताच जंगल परिसरात लपून बसलेल्या ६० ते ७० च्या संख्येत असलेल्या सीआरपीएफ जवानांनी थांबण्यास सांगितले. मी थांबताच जवानांनी माझ्या दिशेने गोळ्या झाडल्या. यात एक गोळी माझ्या हाताला लागल्याने मी जखमी झालो. त्यानंतर पोलिसांनी मला पेरमिली आरोग्य केंद्रात नेऊन प्रथमोपचार केला. या पोलिसांनी तेथील डॉक्टर गणेश मडावी यांना सदर युवक दुचाकीवरून पडल्याचे दवाखान्यात सांगितले. त्यानंतर सायंकाळी पेरमिली पोलीस ठाण्याच्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये रात्रभर ठेवले. सदर घटनेबाबत कुणालाही सांगायचे नाही, अशी धमकीही पोलिसांनी मला दिली, असेही बिरसू आत्राम यांनी यावेळी सांगितले. दोन दिवसांनी सीआरपीएफ जवान माझ्या घरी आले व मला १० हजार रूपये देऊन झालेल्या प्रकाराची माहिती कुणालाही द्यायची, अशी तंबीही दिली. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही न्याय मिळाला नाही म्हणून १ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात येणार आहे, असे आत्राम म्हणाले.