डोंगा कंत्राटदाराकडून प्रवाशांची प्रचंड लूट

By Admin | Updated: August 30, 2015 01:03 IST2015-08-30T01:03:30+5:302015-08-30T01:03:30+5:30

गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली भागातील नागरिकांना डोंग्यातून तेलंगणा राज्यात जाण्यासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

A huge loot of passengers from Donga Contractor | डोंगा कंत्राटदाराकडून प्रवाशांची प्रचंड लूट

डोंगा कंत्राटदाराकडून प्रवाशांची प्रचंड लूट

नदी घाटावर भाडेफलकाचा अभाव : छत्तीसगड, तेलंगणा राज्यात जाण्यासाठी प्रवास
आसरअल्ली : गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली भागातील नागरिकांना डोंग्यातून तेलंगणा राज्यात जाण्यासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. डोंगा कंत्राटदाराच्या मनमानीमुळे सर्वसामान्यांची आर्थिक लूट येथे केली जात आहे.
सिरोंचा तालुक्याला लागून तेलंगणा व छत्तीसगड राज्याची सीमा आहे. या सीमेवरून गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती या तीन मोठ्या नद्या वाहतात. मागील चार वर्षांपासून गोदावरी नदीवरील पुलाचे काम सुरू आहे. परंतु ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे या तालुक्यातील हजारो नागरिकांना डोंग्याने नद्यांमधून प्रवास करून तेलंगणा व छत्तीसगड राज्यात जावे लागते. डोंग्याच्या साहाय्याने चारचाकी व मोठे वाहनही नागरिक घेऊन जातात. वृध्द नागरिक, मूल, महिला यांचाही प्रवास डोंग्याच्या सहाय्यानेच होतो. या संधीचा फायदा घेत डोंगा कंत्राटदाराची मनमानी सुरू आहे. वाटेल तसे पैसे ते नागरिकांकडून उकळतात. उन्हाळ्याच्या दिवसात ३० रूपये एका प्रवाशाला तर पावसाळा व हिवाळ्यात ५०, ७० व १०० रूपये वसूल केले जातात. लोकांच्या अडचणीचा फायदा घेऊन कंत्राटदाराकडून त्यांना नागविले जात आहे. वर्षाला आम्हाला १७ लाख रूपये ठेका द्यावा लागतो. त्यामुळे आम्ही तो पैसा वसूल करतो, असे ते सांगतात. एकूणच हा सारा प्रकार सर्वसामान्यांची लूट करणारा आहे. तेलंगणा व आंध्र प्रदेश राज्याने त्यांच्या सीमावर्ती भागात दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अनेक सुविधा निर्माण केल्या आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने सिरोंचा तालुक्यात या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे.(वार्ताहर)

Web Title: A huge loot of passengers from Donga Contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.